लोकसभा निवडणूक LIVE : आंध्रमध्ये मतदान केंद्रातच टीडीपी नेत्याची गोळ्या झाडून हत्या
२० राज्यांमधल्या ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान होत आहे.
नवी दिल्ली : आज लोकसभेची लढाई खऱ्या अर्थाने सुरू होत असून २० राज्यांमधल्या ९१ मतदारसंघांमध्ये पहिल्या फेरीचे मतदान होत आहे. या सर्व मतदारसंघांमधल्या प्रत्येक मतदान केंद्रांवर निवडणूक अधिकारी आणि पथकं सज्ज आहेत. विदर्भातल्या ७ मतदारसंघांबरोबरच छत्तीसगडमधल्या अतिसंवेदनशील बस्तरमध्येही आज पहिल्या टप्प्यातच मतदान होत आहे. यावेळी प्रथमच सर्व मतदानकेंद्रांवर व्हीव्हीपॅट मतदानयंत्राचा वापर होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. देशाच्या विकासासाठी मतदान महत्त्वाचे असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तर लोकशाहीसाठी सर्वांनी मतदान करा असे आवाहन सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी केले.
टीडीपी नेते भास्कर रेड्डी यांच्यावर मतदान केंद्रातच गोळ्या झाडण्यात आल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. टीडीपी आणि वाईएसआरसीपी (YSRCP) समर्थक एकमेकांना भिडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले.
जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेसचे बटणच दाबले जात नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. उत्तर प्रदेशच्या सहानरपूरमध्ये ईव्हीएम बिघाडीचे प्रकरण समोर आले आहे. इथे पोलिंग बुथ मधील साधारण 100 हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने त्या बदलण्यात आल्या. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षल्यांकडून आयईडी स्फोट घडवून आणला आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. फरसगांव ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. एसपीने या घटनेला दुजोरा दिला आहे. बिहारच्या औरंगाबाद संसदीय क्षेत्रातील सिलियामध्ये बूथ नंबर 9 च्या जवळ आयईडी विस्फोटक सापडले. गयाचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या ठिकाणी बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू आहे.
विदर्भातील सात जागांसाठी आज मतदान होत आहे. वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. सर्वच ठिकाणी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि आणि सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने कंबर कसली आहे. नक्षलप्रभावित भागात सकाळी ७ ते ३ पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे भाजप-सेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत आहे.
काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी व बसपा रिंगणात आहेत. विदर्भातील सात जागांपैकी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाना पटोले यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर चौथ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. मतदान होत असलेल्या सातपैकी सध्या चार मतदारसंघांत भाजप, दोन ठिकाणी सेना आणि भंडाऱ्यात राष्ट्रवादीचा खासदार आहे.