नवी दिल्ली : एक्झिट पोल ही नौटंकी असल्याची टीका राष्ट्रवादी पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालास तीन दिवस राहीले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात निवडणुकीच्या एक्झिट पोलची चर्चा जोरात आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपा सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे एक्झिट पोलवर विरोधक कडाडून टीका करत आहेत. शरद पवार यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज देशात वेगळा माहौल आहे. देशात आणि बाहेरही देश कोणत्या मार्गाने जाईल असा विचार सुरू आहे. सगळे चॅनेल्स वर्तमानपत्रातील रिपोर्ट पाहताना काल संध्याकाळपासून मला फोन येताय आहेत. आम्ही ज्या मार्गावरून जाणार होतो त्या ऐवजी दुसरा मार्ग कसा समोर आला ? असे मला लोक विचारत आहेत. त्यावर काळजी करू नका असेच मी सर्वांना सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियामागे त्यांची ताकद आहे त्यामुळे वेगळी भूमिका ते मांडत आहेत. दोन दिवसात सत्य समोर येईल आणि लोकांच्या मनातील चिंता दूर होईल असे पवार म्हणाले. 



निवडणूक होतात, कोण जिंकत, कोण हरतं पण ज्यांच्यावर देशाची जबाबदारी आहे ती व्यक्ती हिमालयात जाऊन बसते आणि एक वेगळा संदेश देते हे आम्ही कधी पाहीलं नसल्याचा टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. सर्व समाजाच्या हिताची काळजी आपण घेतली पाहिले पण इथे 
राजकारणात नौटंकी होत आहे आणि काल संध्याकाळपासून नौटंकी सुरू असल्याचे पवार पुढे म्हणाले.