गुजरात : अभिनंदन यांना सोडा नाही तर पाकिस्तानसाठी कत्ल की रात असेल अशी धमकीच पाकिस्तानला भारताने दिली होती असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुजरात येथील पाटणमधील सभेत ते बोलत होते. मी काय करेन हे पवारांना कळत नाही तर इम्रानला काय कळणार ? असेही मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये प्रचारसभेत मोदींनी सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेले मिग २१ चे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने सोडले नसते तर पाकिस्तानसाठी ते दुःसाहस ठरले असते असे पंतप्रधान म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या देशाच्या पुत्राचे रक्षण करणे हे माझ्या गृह राज्यातील लोकांचे कर्तव्य आहे असे आवाहन त्यांनी गुजरात वासियांना केले. मला गुजरातमध्ये सर्व 26 जागा द्या. माझे सरकार सत्तेत पुन्हा येईल. पण गुजरातने भाजपाला 26 जागा दिल्या नाहीत तर असे का झाले ? अशी चर्चा टीव्हीवर पाहायला मिळेल. पंतप्रधानाची खुर्ची राहील किंवा नाही राहणार पण मी निर्णय घेतलाय, एकतर मी जिवंत राहीन किंवा दहशतवादी जिवंत राहतील असेही ते म्हणाले. 



पाटणच्या या सभेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मोदी काय करतात ते मला माहीत नाही असे शरद पवार म्हणाले होते. जर पवारांना मी काय करतो ते माहित नसेल तर इम्रान खानला कसे कळेल ? असा टोला पंतप्रधान मोदींनी लगावला. कुंभच्या स्वच्छतेची अमेरिकेतही चर्चा झाली. त्यानंतर मी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पाय धुवले असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.