जवानांच्या-शहिदांच्या नावावर मतं मागणं पंतप्रधान मोदींना भोवणार?
`तुमचं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकतं का? पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकतं का?`
नवी दिल्ली : बालाकोटमधील हवाई हल्ल्याचा मुद्दा करत मतं मागितल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी आपलं मत बालाकोटमध्ये हल्ला करणाऱ्यांना अर्पण करावं, असं वक्तव्य मोदींनी लातूरच्या औसा येथील सभेत मंगळवारी केलं. मोदींच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतलीय. आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी अहवाल मागितलाय. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय लष्कर आणि जवानांच्या नावाने कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने प्रचारातून किंवा निवडणुकी संदर्भातील कुठल्याही कार्यक्रमातून मत मागू नये, असे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने १९ मार्च रोजी दिले होते.
'तुमचं पहिलं मत हवाई हल्ला करणाऱ्यांसाठी देणार का?' असं म्हणत मोदींनी औसामध्ये नवमतदारांना देशभक्तीची साद घातली होती. 'तुमचं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकतं का? पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकतं का? देशातील गरीब, शेतकरी, कामगार, महिलांच्या विकासासाठी तुमचं पहिलं मत समर्पित होऊ शकतं का?' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शत्रूला घरात घुसून मारण्याची नीती असणाऱ्या भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन नवमतदारांना केलं होतं.
यानंतर पंतप्रधान मोदींविरुद्ध मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवलीय. बालाकोटमध्ये दहशतवादी शिबिरांवर हवाई हल्ला करणाऱ्या वायुसेनेच्या नावावर मंत मागून नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आचारसंहितेचं उल्लंघन केलंय, अशी तक्रार माकपनं केलीय.