नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुढील सरकार मोदी सरकारच येणार, असा विश्वास बाळगत विद्यमान मोदींनी कामाला सुरूवात केलीय. पंतप्रधान कार्यालयाने २३ मे नंतरच्या १०० दिवसांची कृती योजना आखायला सुरूवात केलीय. भाजपच्या या अतिविश्वासाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेवर आम्हीच येणार, असा विश्वास ठामपणे भाजपा वर्तुळात व्यक्त होतोय. मात्र हा निव्वळ राजकीय अभिनिवेश नसून निवडणुकीनंतरच्या कारभारासाठी तयारीला लागल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या या आदेशातून व्यक्त होतंय. 


प्रत्येक मंत्रालयाच्या सचिवाला पंतप्रधान कार्यालयाने कृतीयोजना तयार करण्याचे आदेश दिलेत. २३ मे नंतर जे सरकार येईल त्याला हा कृती कार्यक्रम उपयोगी पडेल, अशी प्रतिक्रिया एका विभागाच्या सचिवाने दिली. 


दरम्यान, आज देशभरात तिसऱ्या टप्प्यातील ११७ मतदारसंघांत मतदान पार पडतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर जाण्याआधी पंतप्रधान मोदींनी त्यांची आई हिराबेन यांचे घरी जात आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईने दुर्गा मातेचा प्रसादही दिला. हिराबेन यांनी मोदींना लाल रंगाचं वस्त्र देत आशीर्वाद दिला. लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे.