सहाव्या टप्प्यातील ५९ जागांसाठी मतदानास सुरुवात
या टप्प्यात ५९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी ४४ जागा भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत जिंकल्या होत्या.
नवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील ७, हरियाणातील १०, उत्तर प्रदेशातील १४, झारखंडमधील ४, बिहारमधील ८, बंगालमध्ये ८ आणि मध्य प्रदेशात ८ जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात ५९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्यापैकी ४४ जागा भाजपने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत जिंकल्या होत्या. टीएमसीने ८, कॉंग्रेसने २ आणि अन्य ५ जागांवर विजयी झाले होते. पूर्वांचलमध्ये फक्त आजमगढ जागा विरोधी पक्षाला गेली होती. तिथे मुलायम सिंग यादव विजयी झाले होते.
कोणत्या मतदारसंघात मतदान ?
दिल्ली (७जागा) - नवी दिल्ली, चांदणी चौक, पूर्व दिल्ली, उत्तर पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली येथे मतदान होईल.
मध्य प्रदेश ( ८ जागा) - भोपाळ, गुना, ग्वाल्हेर, भिंड, मुरैना, राजगड, विदिशा आणि सागर मतदारसंघावर लक्ष असणार आहे. भोपाळ मध्ये प्रज्ञा साध्वी आणि दिग्विजय सिंग यांच्यात महत्त्वाची लढत आहे.
बिहार (८ जागा) - पूर्व चंपारण, पश्चिम चंपारण, सिवान, वैशाली, गोपालगंज, महाराजगंज, वाल्मिकी मगर, शिवहर मतदारसंघावर लक्ष असेल.
युपी (१४ जागा) - सुल्तानपूर, प्रयागराज, फूलपूर, आजमगड, संत कबीर नगर, बस्ती, डुमरियागंज, मछलीनगर, प्रतापगड, आंबेडकर नगर, श्रावस्ती आणि भदोही या मतदारसंघात मतदान होईल.
प. बंगाल (८ जागा) - घाटल, झारग्राम, तामलुक, कांठी, मेदीनीपूर, पूर्णिया, बांकुडा आणि विष्णुपूर येथेमतदान होईल.
झारखंड (४ जागा) - धनबाद, जमशेदपूर, गिरीडीह आणि सिंगभूमी येथे मतदान होईल.
विश्लेषण
हरियाणातील सर्वच १० जागांवर मतदान होणार आहे. २०१४ मध्ये भाजपने ७ जागा जिंकल्या होत्या. हरियाणात केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर आणि राव इंद्रजीत यांचे राजकीय भवितव्य ठरेल. हरियाणात भाजपचे बंडखोर राजकुमार सैनी याची लोकतंत्र सुरक्षा पार्टी यांनी बसप सोबत समन्वयाने उमेदवार उतरवले आणि दुष्यंत चौटाला यांची जननायक जनता पार्टी ला आपने पाठिंबा दिला आहे. या दोन नव्या राजकीय पक्षांची परिक्षा असणार आहे.
- युपीत अखिलेश यादव आजमगड मतदारसंघातून लढत आहेत त्यांच्या विरोधात भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव (निरहुआ) यांना भाजपने मैदानात उतरवले आहे. आजमगड मध्ये यादवांचा मुकूट म्हटलं जातं. कारण हा मतदारसंघ मुलायम सिंग यांचा आहे. २०१४ मध्ये मुलायम सिंग यादव केवळ ६३ हजार मतांनी विजयी झाले होते. आजमगडमधील विधानसभेचे गणित पाहिलं तर ३ जागेवर सपाचे आमदार तर २ जागेवर बसपचे आमदार आहेत. मुस्लिम, यादव आणि दलित मत मिळून अखिलेश यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.
-जगदंबिका पाल, रीता बहुगुणा आणि निषाद पार्टीचे प्रवीण निषाद यांचे नशीब मतपेटीत बंद होणार आहे. विशेष म्हणजे प्रियांका गांधी यांनी पुर्वांचलमध्ये चांगला प्रचार केला.
- तर दिल्लीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. २०१४ च्या निवडणूकीत दिल्लीतील सातही जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळेस भाजप तर्फे गौतम गंभीर, डाॅ हर्षवर्धन, मनोज तिवारी, मिनाक्षी लेखी, हंसराज हंस, रमेश बिधुडी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर कॉंग्रेसच्या शीला दिक्षित, अजय माकन, बाॅक्सर विजेंद्र, अरविंदर सिंग लवली निवडणूकीच्या मैदानात आहेत.