नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ साठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती आणि प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड आज आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत. राजनाथसिंह लखनऊमधून तर राज्यवर्धनसिंह राठोड जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दाखल करत आहेत. अर्ज दाखल करण्याआधी राजनाथसिंह यांची लखनऊमधून भव्य रॅली निघाली. उल्लेखनीय म्हणजे राजनाथ सिंह यांच्या रोड शोमधून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मात्र दिसले नाहीत. त्याचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं द्वेष प्रचार आणि आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी योगी आदित्यनाथांवर ७२ तासांची बंदी घातलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी साडे नऊ वाजता राजनाथ भाजपाच्या प्रदेश कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. १० वाजता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांचा रोड शो सुरू झाला. जीपीओ, हजरतगंज, मे फेअर नाका, परिवर्तन चौक या मार्गाने हा रोड शो जाणार आहे. दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला राजनाथ सिंह आपला अर्ज दाखल करणार आहेत.


लखनऊची जागा हायप्रोफाईल समजली जाते. इथे समाजवादी पार्टी आणि बसपाला कधीही विजय मिळालेला नाही. १९९१ पासून भाजपाने या जागेवर कब्जा केलाय. मुस्लिम, ब्राह्मण, वैश्य आणि अनुसुचित जातींचे मतदार इथे निर्णायक भूमिका बजावतात.  



दुसरीकडे आज मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपचे अनुसूचित मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष कौशल किशोरदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. या दरम्यान भाजपचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पाचव्या टप्प्यात ८ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.