आज लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; दिल्लीत संध्याकाळी पत्रकार परिषद
शनिवारी निवडणूक आयोगाची बैठक झाली.
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून आज (रविवारी) लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाकडून आज संध्याकाळी पाच वाजता दिल्लीत पत्रकार परिषद आयोजित आली आहे. कालच निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. त्यानंतर लवकरच निवडणुका जाहीर होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला असून आजच्या पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा होऊ शकते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ५४३ जागांसाठी ७ ते ८ टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान १० एप्रिलआधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जूनला संपत आहे. २०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख ५ मार्चला जाहीर झाली होती. तेव्हा ७ एप्रिल ते १२ मे या कालखंडात ९ टप्प्यात मतदान झालं होतं. या निवडणूकांसाठी महाराष्ट्रात तीन टप्प्यांत मतदान होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकतं अशा चर्चेलाही उधाण आलं आहे.
१२ ते १५ मे दरम्यान मतमोजणीची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता राजकीय पटलावरील हालचालींनाही वेग आल्याचं स्पष्ट होत आहे. सूत्रांकडून मिळत असणाऱ्या माहितीनुसार निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकण्याची चर्चा आहे. लोकसभेसोबतच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक घ्यायची की नाही यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे. तेव्हा आता या घडामोडींना कोणतं वळण मिळणार हे पाहणंही तितकच महत्त्वाचं ठरणार आहे.