औसा, लातूर : लातूरच्या औसामधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि त्यांच्या महामिलावट सहकाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेची अवस्था बिकट झाल्याची टीका त्यांनी यावेळी केली. काँग्रेसच्या नेत्यांनी समजूतीनं काम केलं असतं तर पाकिस्तानचा जन्म झालाच नसता, असंही मोदींनी यावेळी म्हटलंय. आपल्या भाषणात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांना मोदींनी आपल्या स्टाईलमध्ये आवाहनही केलंय. यावेळी नवमतदारांना सैनिक आणि शहिदांसाठीही मतदान करण्याचं आवाहन मोदींनी केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुमचं पहिलं मत हवाई हल्ला करणाऱ्यांसाठी देणार का?' असं म्हणत मोदींनी नवमतदारांना देशभक्तीची साद घातली. 'तुमचं मत बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकतं का? पुलवामामध्ये शहीद झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकतं का? देशातील गरीब, शेतकरी, कामगार, महिलांच्या विकासासाठी तुमचं पहिलं मत समर्पित होऊ शकतं का?' असं म्हणत मोदींनी शत्रूला घरात घुसून मारण्याची नीती असणाऱ्या भाजपलाच मतदान करण्याचं आवाहन नवमतदारांना केलं. 



इतकंच नाही तर, 'सैन्यदलाला देण्यात आलेल्या विशेष शक्ती परत घेण्याचा काँग्रेसचा मनस आहे. पाकिस्तानलाही हेच हवंय, कारण यामुळे दहशतवादाला ते प्रोत्साहन देऊ शकतील. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आणि बालाकोटवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यानंतर विरोधी पक्षानं सतत सुरक्षा दलाच्या वीरतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं... सत्तेत आल्यानंतर केवळ भ्रष्टाचार हे असं एकमेव काम आहे जे काँग्रेसनं पूर्ण एकनिष्ठतेनं केलं' असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 


पवारांना हे शोभतं का?


काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस काश्मीरमधील फुटिरतावाद्यांसोबत आहे. काँग्रेसकडून लोकांना आता अपेक्षा नाही. मात्र शरद पवार तुम्हाला तरी हे शोभतं का? असा सवाल यावेळी मोदींनी केला. ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला त्यांना मानवाधिकाराची भाषा शोभत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी काँग्रेसवर केली.   


ठाकरे-मोदी हातात हात


औसातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे या दोघांनी व्यासपीठावर दमदार आगमन केलं. मोदी आणि उद्धव ठाकरे हे दोघे नेते हातात हात घालून व्यासपीठाकडे आले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांची एकत्र भेट घेतली. मोदींनी भाषणातही उद्धव ठाकरेंचा उल्लेख 'छोटा भाऊ' म्हणून केला. यावेळी, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. कुरापत खोर पाकिस्तान संपवून टाका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.