वायनाड : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या लोकसभा निवडणुकीतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देतील अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या चर्चांवर आता खुद्द प्रियंका गांधींनीच उत्तर दिलं आहे. 'माझा भाऊ आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मला वाराणसीमधून लढायला सांगितलं, तर मी नक्कीच वाराणसीमधून निवडणुकीला उभी राहिन, मी यासाठी तयार आहे', असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका गांधी या वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी दोन दिवस आल्या होत्या. वायनाडमधून निघताना प्रियंका गांधींनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. उत्तर प्रदेशच्या अमेठीबरोबरच राहुल गांधी हे यंदा केरळच्या वायनाडमधून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.



वायनाडमधल्या प्रचारामध्ये प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदी सरकारने शेतकऱ्यांची वाट लावली. पण काँग्रेसची सत्ता आली तर आम्ही शेतकऱ्यांची काळजी घेऊ आणि त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करू, असं आश्वासन प्रियंका गांधींनी दिलं.


'मागच्या ५ वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी देशाची विभागणी केली. मोदींनी श्रीमंतांची काळजी घेतली, पण गरिबांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करु, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, असं म्हणाले. पण राहुल गांधींसाठी न्याय आणि सत्य महत्त्वाचं आहे,' असं प्रियंका गांधी म्हणाल्या. २३ एप्रिलला केरळच्या सगळ्या २० लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे.


राहुल गांधींच्या प्रचाराआधी प्रियंका गांधी सीआरपीएफचे शहीद जवान वसंत कुमार यांच्या कुटुंबाला भेटल्या. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये वसंत कुमार शहीद झाले होते.