Mamata Banerjee On PM Modi God Remark: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काही दिवसांपूर्वीच्या एका जाहीर सभेत 'काळजीवाहू पंतप्रधान' असा उल्लेख केला होता. बुधवारी ममता यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या 'मला परेश्वराने विशिष्ट कारणासाठी पाठवलं आहे,' या विधानाचा समाचार घेतला. "पंतप्रधान मोदी स्वत:ला देव समजत असतील तर त्यांच्यासाठी मंदिर बांधलं पाहिले. म्हणजे ते तिथे बसतील ज्यामुळे दंगलींना उसळण्याचं प्रमाण कमी होईल," असा टोला ममतांनी लगावला आहे. 


मी अनेक पंतप्रधानांबरोबर काम केलं आहे पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आम्ही त्यांच्यासाठी मंदिर बांधू आणि त्यांची तिथे पूजा करु. त्यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांना नैवद्य म्हणून ढोकळाही वाढू" असं तृणमूलच्या प्रमुख असलेल्या ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यामधील एका जाहीर सभेत म्हटलं आहे. पुढे पंतप्रधान मोदींनी टोमणा मारताना ममता यांनी, "मी अनेक पंतप्रधानांबरोबर काम केलं आहे. मी मनमोहन सिंग, राजीव गांधी, नृसिंह राव, देवे गौडा यांच्याबरोबर काम केलं आहे. मात्र मी यांच्यासारखा पंतप्रधान कधीच पाहिला नाही. अशा पंतप्रधानांची आपल्याला गरज नाही," असं म्हटलं.


मोदी काय म्हणाले होते?


मागील आठवड्यामध्ये पंतप्रधान मोदींनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी, देवाने आपल्याला एका विशिष्ट हेतूसाठी निवडल्याचं वाटतं असं म्हटलं आहे. तो हेतू पूर्ण होईपर्यंत आपण काम करत राहू असंही मोदी म्हणाले होते. "म्हणून मी स्वत:ला पूर्णपणे देवासाठी वाहून घेतलं आहे," असं मोदींनी एएनआयशी बोलताना म्हटलं होतं. यावरुन विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला होता.


मानसिक संतुलनावरुन टीका


राष्ट्रीय जनता दलचे नेते तसेच राज्यसभा खासदार मनोज झा यांनी, "आम्ही असं काही बोललो असतो तर आमच्या कुटुंबियांनी आम्हाला इलाज करण्यासाठी डॉक्टरांकडे नेलं असतं," असं म्हटलं. पाटण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये झा यांनी, "म्हैस, मंगळसूत्र यासारख्या वक्तव्यानंतर आता पंतप्रधान विरोधक तुमचे नळ पळवतील आणि वीज कापतील असं सांगत आहे. जगातील कोणताही मोठा नेता ही अशी विधानं करत नाही. तुमच्या मानसिक आरोग्यापेक्षा तुमची हाव अधिक असते तेव्हा लोक अशा गोष्टी करतात," असा टोला लगावला होता.


पंतप्रधान या उल्लेखावरही आक्षेप


पंतप्रधान मोदींचा पंतप्रधान असा उल्लेख करण्यावरही ममता यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेप घेतला होता. "मोदींना प्रचार करण्याचा हक्क आहे. मात्र यामध्ये त्यांचा उल्लेख पंतप्रधान असा केला जात असल्याचं मला आश्चर्य वाटतं. त्यांच्या प्रचाराच्या जाहिरातींमध्येही त्यांचा पंतप्रधान असा उल्लेख असतो," असं ममता म्हणाल्या होत्या. आपल्या पक्षाकडून आपला उल्लेख तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख असा केला जातो. तुम्ही हे असं करु शकता का? असा सवाल ममता यांनी केला.