2019 चे Exit Poll किती अचूक होते? सर्वेक्षणाची आकडेवारी अन् निकालात नेमका किती फरक?
What Was Predicted in 2019 Exit Polls: यंदाच्या म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या एक्झिट पोलची आकडेवारी 1 जून रोजी समोर आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येईल असं जवळपास सर्वच एक्झिट पोलने म्हटलं आहे.
What Was Predicted in 2019 Exit Polls: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर वेगवेगळ्या एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज वर्तवला जात असून बहुतेक सर्व विश्लेषकांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएला बहुमत मिळेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पातळीवर 400 हून अधिक जागा मिळवण्याचा निर्धार केलेल्या भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने 350 चा टप्पा सहज ओलांडता येईल असं चित्र जवळपास सर्वच मतदानपूर्व चाचण्यांमध्ये दिसत आहे. मात्र अशाचप्रकारे 2019 चे एक्झिट पोल आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये किती तफावत होती? एक्झिट पोलनुसार निकाल लागेल होते का? यासंदर्भातील आकडेवारी नेमकं काय सांगते हे पाहूयात...
अचूक होते का 2019 चे एक्झिट पोल?
2019 ला लोकसभा निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये व्यक्त केलेले अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल याची सांगड कशी घातली गेली होती यावर नजर टाकल्यास त्यावेळेस व्यक्त करण्यात आलेले अंदाज आणि निकाल यांचा ताळमेळ लागला नव्हता. मात्र विशेष म्हणजे तेव्हा सुद्धा राष्ट्रीय लोकशाही आघाडी विजयी होईल हा अंदाज अगदी अचूक ठरला होता. 2019 मध्ये प्रत्यक्ष निकालामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 353 जागा जिंकलेल्या. त्यापैकी 303 जागा एकट्या भाजपाने जिंकल्या होत्या. त्यावेळेस काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला 91 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. काँग्रेसला 52 जागा मिळाल्या होत्या.
2019 चे एक्झिट पोल कसे होते?
2019 ला 'इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया'ने एक्झिट पोलमध्ये एनडीएला 339 ते 365 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलेला. तर याच सर्वेक्षणात यूपीएला 77 ते 108 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 'न्यूज टुडे-टुडेज'ने एनडीएला 350 तर युपीएला 95 जागांचा अंदाज व्यक्त केलेला. 'टाइम्स नाऊ-व्हीएमआर'ने एनडीएला 306 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केलेला तर यूपीएला 132 जागा मिळू शकतील असं म्हटलं होतं. मात्र हा अंदाज चुकला होता. तसेच 'न्यूज 18-आयपीएसओएस'ने 2019 मध्ये एनडीएला 336 जागा मिळतील असं म्हटलेलं. तर एनडीला 82 जागांवर यश मिळेल असं सांगण्यात आलं होतं.
50 जागांचा फरक
'सी व्होटर'ने 2019 साली एनडीएला 287 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. तर यूपीएला 128 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला. मात्र हा अंदाज पूर्णपणे चुकला होता. यामध्ये 35 हून अधिक जागांची तफावत दिसून आलेली. अगदी 'सी व्होटर'सारखीच आकडेवारी 'इंडिया न्यूज-पोलस्ट्रॅट'ने दिलेली. याचप्रमाणे 'इंडिया टीव्ही-सीएनएक्स'ने एनडीएला 300 आणि यूपीएला 120 जागांचा अंदाज व्यक्त केलेला. मात्र हा अंदाजही 50 जागांहून अधिकच्या अंतराने चुकला होता.
यंदाचे एक्झिट पोल काय सांगतात?
यंदा मांडण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए 350 हून अधिक जागांवर विजय मिळवण्यात यश येईल असं जवळपास सर्वोच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये म्हटलं आहे. सलग दोन टर्म सत्तेत राहिल्यानंतरही केंद्रीतील मोदी सरकारचा भारतीयांमध्ये सकारात्मक प्रभाव असून 'इंडिया' आघाडीला फारसं यश मिळणार नसल्याचं 2024 च्या एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.
(Desclaimer: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या सर्व 7 टप्प्यांसाठी मतदान पूर्ण झाले असून 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. त्याआधी, ZEE 24 Taas ने आपल्या दर्शकांसाठी एक मेगा एक्झिट पोल आणला आहे. या मेगा एक्झिट पोलमध्ये आम्ही देशातील अनेक मोठ्या एजन्सीचे एक्झिट पोल डेटा दाखवणार आहोत. दरम्यान झी 24 तास जी आकडेवारी दाखवेल ती वेगवेगळ्या एजन्सींच्या सर्वेक्षणातून मिळवलेली आकडेवारी आहे. ज्यासाठी 'झी 24 तास' जबाबदार नाही. हे आकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल नाहीत, फक्त एक्झिट पोल आहेत.)