नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७६ टक्के मतदानाची नोंद झाली. तर देशपातळीवर सरासरी ६४ टक्के मतदान झाले. तुरळक हिंसेचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. तर जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कुलागाममध्ये अवघे १०.३ टक्के मतदान झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, हिंदीबहुल म्हणून ओळख असणाऱ्या राजस्थान, उत्तर प्रदेश अनुक्रमे ६२ आणि ५३.१२ टक्के इतके मतदान झाले. तर मध्य प्रदेशातील सहा मतदारसंघांमध्ये ६५.८६ टक्के मतदान झाले. याशिवाय, महाराष्ट्र (१७ जागा) ५२ टक्के, ओडिशात (सहा जागा)  ६४.०५ टक्के, बिहारमध्ये (पाच जागा)  ५३.६७ टक्के आणि झारखंडच्या तीन जागांसाठी ६३.४२ टक्के इतके मतदान झाले.


एकूणच चौथ्या टप्प्याच्या मतदानावेळी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, ओडिशा अशा सर्वच ठिकाणी मतदारांचा उत्साह दिसून आला. उन्हाचा पारा वाढला असला तरी मतदारांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावले. अनेक ठिकाणी वेळ संपतानाही मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र होते. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा लोकसभा मतदारसंघात तर रात्री १० वाजेपर्यंत मतदान सुरु होते. या मतदारसंघातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ रिंगणात उतरला आहे. याशिवाय, उत्तर प्रदेश आणि बिहारचा विचार करता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार, डिंपल यादव, बाबुल सुप्रियो राष्ट्रीय लोक समता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवा यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.