नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ चा गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निष्काळजीपणाची धक्कादायक माहिती समोर येतेय. हिमाचल प्रदेशमध्ये मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकारी 'मॉक' मतं (प्रयोगधर्तीवर) मशीनमधून हटवण्यास विसरल्याचं लक्षात आलं. यानंतर अधिकाऱ्यांनी मतांची संख्या जुळवण्यासाठी चक्क मतदान यंत्रामधून काही मतं स्वत:च हटवून टाकली. ही गोष्ट समोर आल्यानंतर निवडणूक आयोगानं २० अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हिंदुस्तान टाईम्स'नं दिलेल्या बातमीनुसार, लोकसभा निवडणूक २०१९ च्या पाचव्या टप्प्यात मतदानाच्या दिवशी मतदान सुरू होण्याच्या तासभर अगोदर ईव्हीएम यंत्रांची पडताळणी करताना प्रयोगासाठी मतं टाकून पाहिली होती. यासाठी जवळपास ५० मतंही टाकण्यात आली होती. यावेळी पोलिंग एजंटही उपस्थित होते. परंतु, मतदान सुरू होण्याआधी जवळपास २० अधिकारी 'मॉक' मतं मिटवण्यास विसरले. नंतर मात्र आपली चूक त्यांच्या ध्यानात आली. त्यामुळे त्यांनी स्वत:च मतदान यंत्रातील काही मतं मिटवून टाकली. परंतु, एव्हाना निवडणूक निरीक्षकांच्या ही चूक ध्यानात आली होती. 


हिमाचल प्रदेशमध्ये पाच मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रांमधील 'मॉक' मतं मिटवण्याचं निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षातच आलं नाही. मंडी लोकसभा मतदारसंघातील चौक, सालवाहन आणि हरवान्ही गावात तसंच शिमला मतदारसंघातील काशिमपुरा गावात आणि हमिरपूर मतदारसंघातील भागर मध्ये हे अधिकारी तैनात होते. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पाचव्या टप्प्यात शिमला, मंडी, हमिरपूर, कांगडा या मतदारसंघात १९ मे रोजी मतदान पार पडलं होतं. 



राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) देवेश कुमार यांनी मंगळवारी 'निवडणूक आयोग या घटनेची पडताळणी करत आहे. दोषी आढळल्यास पाच मुख्य अधिकारी आणि १५ मतदान अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होऊ शकते' अशी माहिती दिलीय.