`मोदी विरुद्ध गोंधळामध्ये कोणाला निवडायचे जनतेला माहितीये`
`अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस` या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी केलेल्या महाआघाडीची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी खिल्ली उडवली. देशातील जनता हुशार आहे. त्यांना कोणाला निवडायचे आणि कोणाला नाही, हे नीट माहिती आहे. ते कधीच गोंधळ घालणाऱ्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी पर्याय म्हणून निवडणार नाहीत, असे अरुण जेटली यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता पाहुन आणि ते पुन्हा केंद्रामध्ये सत्तेत येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व विरोधक भयभीत झाले आहेत. त्यासाठीच त्यांनी एकत्र येऊन महाआघाडी केली असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.
'अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस' या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली. ते म्हणतात, राजकारणी समजतात त्यापेक्षा सामान्य लोक जास्त हुशार असतात. ते कधीच गोंधळ घालणाऱ्यांना पर्याय म्हणून निवडणार नाहीत. लोकांना पाच वर्षे चालू शकेल, असे सरकार हवे आहे. केवळ सहा महिन्यांसाठी चालणारे सरकार त्यांच्या काहीच कामाचे नाही. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत यायला नकोत, हा एकमेव अजेंडा घेऊन विरोधकांनी महाआघाडी तयार केली आहे. विरोधकांच्या मोदीविरोधी अजेंड्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. मोदी यांच्या सरकारच्या कामकाजाबद्दल सर्वसामान्य लोक समाधानी आहेत. त्यामुळे विरोधकांचा अजेंडा येत्या निवडणुकीत नक्कीच अपयशी ठरणार, यात अजिबात शंका नाही.
सध्याच्या राजकीय नेत्यांमध्ये निर्णयक्षम आणि प्रसिद्ध असलेले मोदी हे एकमेव नेते आहेत. त्यांच्याबद्दल विरोधकांच्या मनात भीती आहे. त्यामुळेच सर्व विरोधक त्यांच्याविरोधात एकत्र आले आहेत. अन्यथा इतकी वर्षे एकमेकांविरोधात लढणारे आज एकत्र येण्याचे कारण काय, असा प्रश्नही अरुण जेटली यांनी उपस्थित केला आहे.
विरोधकांच्या महाआघाडीत पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, बसप अध्यक्ष मायावती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे तिघेही या जाहीर सभेला अनुपस्थित होते. आणखी एक पंतप्रधानपदाच्या उमेदवार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच केवळ सभेला आल्या होत्या, याकडेही अरुण जेटली यांनी लक्ष वेधले.