नवी दिल्ली : कोकण कन्या आणि  सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. सुमित्रा महाजन यांनी अधिकृत पत्रक प्रसिद्ध करुन लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे नमूद केले आहे. सुमित्रा महाजन या इंदूरमधून विद्यमान खासदार आहेत. दरम्यान, भाजपने या जागेसाठी उमेदवार घोषित केलेला नाही. त्यामुळे त्यांना निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून उतरविण्याची शक्यता होती. मात्र, महाजन यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केल्याने आता या जागेवरुन कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी निवडणूक लढवणार नाही. तशी घोषणा करत आहे. पक्षाने आता मुक्त मनाने कुठलाही संकोच न बाळगात इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची निवड करावी. सुमित्रा महाजन यांनी आठ वेळा लोकसभेमध्ये इंदूरचे प्रतिनिधीत्व केले आहे.



दरम्यान, सुमित्रा महाजन पुढील आठवडयात ७६ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. भाजपने ७५ वर्षावरील नेत्यांना उमेदवारी देण्याचे टाळले आहे. यंदा उमेदवारी देताना भाजपने मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या दिग्गज ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे सुमित्रा महाजन यांच्याबद्दल अनिश्चितता होती. मात्र, त्यांनीच निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केल्याने भाजपपुढील प्रश्न मोकळा झाला आहे.



आपल्याला आठ वेळा संसदेत पाठविणाऱ्या इंदूरच्या जनतेचे आणि भाजप कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. इंदूरमधून लवकरात लवकर पक्षाने उमेदवार जाहीर करण्याबाबचा निर्णय घ्यावा. त्यामुळे सर्वांसाठी काम करणे अधिक सोपे होईल आणि येथील गोंधळाची स्थिती राहणार नाही, असे सुमित्रा महाजन यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.