Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. देशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने (BJP) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकण्याची घोषणा केली आहे. त्यादृष्टीने भाजपने जोरदार तयारीदेखील सुरु केली आहे. भाजपकडून रणनिती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपने बुरखा ब्रिगेड (Burqa Army) तयार केली आहे. भाजपचा अल्पसंख्याक मोर्चाकडून मुस्लिम महिलांना विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. यात निवडणूक कामही शिकवली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कशी काम करणार बुरखा ब्रिगेड?
मतदानाच्या दिवशी भाजप मुस्लिमबहुल भागातील बुथवर बुरखाधारी महिला तैनात करणार आहे. या बुरखाधारी महिला भाजपच्या पोलिंग एजंट (Polling Agent) म्हणून काम करतील. मतदानादरम्यान होणाऱी फसवणूक रोखण्याचं काम या महिला करतील. मतदानाच्या दिवशी मुस्लिमबहुल भागात महिला बुरखा घालून मतदानासाठी येतात. याचा फायदा काही नतद्रष्ट लोकांकडून घेतला जातो. बुरख्याच्या आडून बनावट मतदान होत असल्याच्या तक्रारी आहेत. हे बनावट मतदान रोखण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हा वेगळा प्रयोग आहे. आणि हा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रम, प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षण दिलं जात आहे.


यासाठी 10-10 महिलांचा ग्रुप बनवला जात असून त्यांना पोलिंग एजंटचं प्रशिक्षण दिलं जात आहे. पोलिंग बूथवर बनावट मतदार  ओळखायचे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने बनावट मतदान रोखण्याचं या ब्रिगेडचं काम असणार आहे. 


मोदी सरकारच्या विविध योजना आणि कामावर खुश होऊन मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग मोदी सरकारबरोबर येईल असा विश्वास भाजपाला आहे. विशेष मुस्लीम महिलांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. मोदी सरकारने तीन तलाक प्रथा बंद केली. महिला एकट्या हज यात्रेला जाऊ शकतात. मोदी सरकारने हज यात्रेत व्हिआयपी कोटा बंद केला. हज कोटा 1.75 लाखांवरुन वाढवून 2 लाख केला आहे. 2 कोटी हून अधिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिलीय. या कामांमुळे मुस्लिम महिलांचा मोदी सरकारवरचा विश्वास वाढला आहे. 


मुस्लीम समाजाचा वाढता पाठिंबा पहाता काही समाजकंटकांकडून मतदान रोखण्याचा किंवा बोगस मतदानाचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे बोगस मतदान रोखण्यसाठी बुरखाधारी महिलांचं पथक तयार करण्यात आलं आहे. याची जबाबादीर भाजप अल्पसंख्याक मोर्चाला देण्यात आली आहे. 


मुस्लीम समाजाची भाजपाला मतं
मुस्लीम मतदारांचा एक मोठा वर्ग भाजपला मतदान करतो. 2014 मध्ये 4 टक्के पुरोगामी मुस्लिमांनी भाजपला मतदान केलं होतं. तर 2019 मध्ये हा 7 टक्के इतका होता. 2014 मध्ये 11 टक्के ओबीसी मुसलमांनी तर 2019 मध्ये 8 टक्के ओबीसी मुसलमानांनी भाजपाला मतदान केलं होतं. याच वोटबँकच्या जोरावर भाजपने रामपूर आणि आझमगढ सारख्या मुस्लिम बहुल मतदार संघात समाजवादी पार्टीला पराभूत केलं होतं. यंदा मुस्लिम समाजाची जास्त मतं मिळतील असा विश्वास भाजपला आहे.