अभिनेत्री जया प्रदा देखील भाजपाच्या वाटेवर ?
अभिनेत्री जया प्रदा देखील आता भाजपाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 ची जोरदार तयारी देशभरात सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षामध्ये दुसऱ्या उमेदवारांची, तसेच सेलिब्रेटींची आयात- निर्यात सुरू आहे. गौतम गंभीरने नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. तसेच आता अभिनेत्री जया प्रदा देखील आता भाजपाच्या वाटेवर असल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जया प्रदा या आजम खान यांच्या विरूद्ध रामपूर येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. जया या समाजवादी पार्टीच्या माजी सदस्या आहेत. 2010 मध्ये त्यांना समाजवादी पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पार्टीच्या विरूद्ध कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
त्यानंतर त्यांनी अमर सिंह यांच्याशी हात मिळवणी केली आणि राष्ट्रीय लोकमंच पार्टीच्या बॅनर अंतर्त 2012 मध्ये लोकसभा निवडणूक देखील लढली. पण त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. जया प्रदा या अमर सिंह यांना आपले गॉडफादर मानतात. अमर सिंह हे सध्या भाजपाशी जवळीक साधताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मै भी चौकीदार' या अभियानात अमर सिंह यांनी देखील रस दाखवला. अमर सिंह यांनी आपल्या ट्विटरवरील नावापुढे चौकीदार शब्द लावला.
जया प्रदा यांनी 1994 मध्ये तेलगू देशम पार्टीतून आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केली होती. तेलगू देशम पार्टीचे संस्थापत एनटी रामाराव यांनी त्यांना पार्टीत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्याशी मतभेद झाल्यानंतर जया प्रदा यांनी तेलगू देशम पार्टीची साथ सोडली होती. आता त्या भाजपात प्रवेश करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.