नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जातीचं राजकारण करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी थेट शब्दांत उत्तर देत मोदींची बाजू मांडली आहे. मोदींनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही, असं म्हणत त्यांनी नेहमीच देशहिताचाच विचार करत देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या योजना आखण्याला प्राधान्य दिल्याचं स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंतप्रधानांच्या जातीचा इथे काय संबंध? त्यांनी कधीच जातीचं राजकारण केलं नाही. त्यांनी नेहमीच विकसनशील राजकारण केलं. देशहिताचाच ध्यास त्यांनी घेतला आहे', असं जेटली यांनी ट्विटमध्ये लिहिलं. 



बसपा प्रमुख मायावती यांनी माध्यमांशी संवाद साधतेवेळी जातीच्या राजकारणाचा मुद्दा अधोरेखित केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जातीच्या मुद्द्याच्या बळावर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून आपण, मागासवर्गातून पुढे आल्याचं खोटं सांगत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. याच आरोपांना फेटाळून लावत जेटली यांनी मोदींची बाजू उचलून धरली आहे. विरोधी पक्षांचे हे आरोप पाहता त्यांना खडे बोल सुनावत मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी विरोधी पक्षांनी कधीच कोणते प्रत्न केले नसल्याची बाब त्यांनी सर्वांसमोर ठेवली. त्यामुपळे ऐन निवडणूकांच्या या माहोलाच जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. 


काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींचीही या वादात उडी


 नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाकडून आपल्या जातीचा मुद्दा अधोरेखित केला जात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देत प्रियंका यांनी आपलं मत समोर ठेवलं होत. 'आजतागायत मला त्यांच्या (पंतप्रधान नरेंद्र मोदींची) जात ठाऊक नाही. विरोधक आणि काँग्रेस हे फक्त विकासाशीच निगडीत मुद्देच उचलून धरत आहेत. आम्ही कधीच त्यांच्यावर खासगी आयुष्यावरुन वक्तव्य केलेलं नाही', असं प्रियंका म्हणाल्याचं पाहायला मिळालं होतं.