राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे डीएमकेच्या जाहीरनाम्यात आश्वासन
राजीव गांधी हत्येच्या दोषींना सोडण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने देशभरात सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. कुठे उमेदवार पळवण्याची स्पर्धा सुरू आहे तर कुठे आश्वासनांची खैरात वाटली जात आहे. प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. मतदारांची जात, भाषा यानुसार त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. द्रमुक पक्षाने असाच प्रकार आपल्या जाहीरनाम्यातून केला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजेच डीएमकेने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला. राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडण्याचे आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. त्यामुळे यावरून पुढच्या काळात वाद उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरांम्बुदूर इथे निवडणूक प्रचारा दरम्यान झालेल्या सभेत राजीव गांधी यांची बॉम्बस्फोट घडवून हत्या करण्यात आली होती. एलटीटीई अर्थात 'लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम' या संघटनेने ही हत्या घडवून आणली होती.
तामीळ अस्मितेला फुंकर
तामीळ अस्मितेला फुंकर घालण्याचा या जाहीरनाम्यात प्रयत्न करण्यात आलाय. दक्षिण भारतातल्या नदीजो़ड प्रकल्पाचा यात उल्लेख करण्यात आलाय. वैद्यकीय प्रवेशांसाठीची नीट परीक्षाच रद्द करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. खासगी नोकरीत आरक्षण देण्याचा निर्धार व्यक्त कऱण्यात आला आहे.