नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीने आपल्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या यादीत बहुतांश विद्यमान खासदारांनाच संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान खासदारांना डावलून बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना संधी देण्यात आली आहे. काही वादग्रस्त जागा आणि खासदारांना पहिल्या यादीत स्थान नाही आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीमध्ये या नावांबद्दल स्पष्टता येणार आहे. आजच्या पहिल्या यादीतून काही ठळक मुद्दे समोर येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पंतप्रधान मोदी यांना वाराणसी येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.


अमित शाह गांधीनगर येथून रिंगणात उतरणार आहेत. या जागेवर लालकृष्ण आडवाणी खासदार होते. याचा अर्थ आडवाणी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.  


अमेठी येथून राहुल गांधी यांना टक्कर देण्यासाठी पार्टीने स्मृती इराणी यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.


तिकिट न मिळाल्यास बंड करण्याचे आव्हान देणाऱ्या साक्षी महाराज यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे.


उत्तर प्रदेशमध्ये सध्याच्या 6 खासदारांचे तिकिट कापण्यात आले आहे. 


महाराष्ट्रात 16 नावे जाहीर करण्यात आली त्यामधील 14 जण हे विद्यमान खासदार आहेत. 2 ठिकाणी नवे उमेदवार देण्यात आले आहेत. 


आग्राहून राम शंकर कठेरिया, शाहजहांपूरहून कृष्णा राज, हरदोईहून अंशुल वर्मा, मिश्रिखहून अंजू बाला, फतेहपूर सीकरीहून बाबूलाल आणि संभलहून सतपाल सैनी यांचे तिकिट कापण्यात आले. 


महाराष्ट्रात दोन विद्यमान खासदारांचे तिकिट कापण्यात आले आहे.


अहमदनगर येथून दिलीप गांधी यांच्या जागी काँग्रेसहून भाजपात आलेले सुजय विखे पाटील यांना तिकिट देण्यात आले आहे. लातूरच्या सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करून सुधाकर श्रिंगारे यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे.