मध्यप्रदेशात महाआघाडीला महाझटका : 2019 ची निवडणूक बसपा एकटी लढणार
बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामजी गौतम यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.
नवी दिल्ली : 2019 लोकसभा निवडणूकीआधीच महाआघाडीला जोरदार झटका बसला आहे. मध्यप्रदेशमध्ये बसपाने 29 लोकसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. बसपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रामजी गौतम यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला. मायावती यांनी गेल्या विधानसभा निवडणूकीतही कोणासोबत युती केली नव्हती. भाजपाचा विजयी महामेरू रोखण्यासाठी महाआघाडी मजबूत करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांनी महाआघाडीची एक बैठक दिल्लीमध्ये बोलावली होती. पण या बैठकीत मायावती सहभागी झाल्या नव्हत्या.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018 मध्ये बसपाला केवळ 2 जागाच मिळाल्या. भिंड मतदार संघात संजीव सिंह मोठ्या मताधिक्याने तर पथरियामध्ये रामबाईट गोविंद सिंह हे 2205 मतांनी जिंकले होते. यावेळी बसपाच्या मत विभागणीबद्दल बोलायला गेलो तर राज्यातील सर्व पक्षांमध्ये बसपाला चौथ्या क्रमांकाची मत मिळाली.
निर्णयावर शिक्कामोर्तब
मध्यप्रदेशमध्ये दोन जागा मिळाल्यानंतर बसपाने कॉंग्रेसला समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे परिस्थीतीत सुधार होईल असे वाटले होते. कॉंग्रेसने जिंकलेल्या 3 राज्यांतील जागांवरील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याप्रसंगी मायावती गैरहजर होत्या.
यातून देखील महाआघाडीला एक संदेश मायावतींनी दिला. तर आजच्या बसपा महाआघाडीत नसण्याच्या निर्णयानंतर यावर शिकामोर्तब झाले आहे.