लोकसभा निवडणूक २०१९ : पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
रथातून मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करत गडकरी अर्ज भरणार आहेत
मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होतंय. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज थोड्याच वेळात अर्ज भरण्यासाठी निघणार आहेत. नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार आहेत. नितीन गडकरी अर्ज भरायला जाण्यासाठी निघताना खास रथ तयार करण्यात आलाय. रथातून मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करत गडकरी अर्ज भरणार आहेत.
सतराव्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होणार आहे. ११, १८, २३, २९ एप्रिल आणि ६, १२ आणि १९ मे रोजी निवडणुका होणार आहेत. सर्व टप्प्यातील मतमोजणी ही २३ मे रोजी होईल. ११ ते २९ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे. यंदा सर्व मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदाराला आपलं मत योग्य उमेदवाराला गेलं की नाही त्याची पडताळणी करण्यात येणार आहे.
भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघ
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल किंवा त्यांच्या पत्नीला भंडारा-गोंदिया मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र राष्ट्रवादीनं नाना पंचबुद्धे यांच्या रुपानं एक नवा चेहरा निवडणुकीत समोर आणलाय. भाजपाकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आज सर्वच पक्ष शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बसपाकडून विजया नांदूरकर आणि भाजपाचे बंडखोर नेते किसान मोर्चाचे उपाध्यक्ष राजेंद्र पटले उमेदवारी अर्ज भरणारेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आणखी एक यादी जाहीर केली. मात्र यादी जाहीर करताना चंद्रपुरातली उमेदवारी अवघ्या एका दिवसात बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली. नव्या यादीत काँग्रेसनं चंद्रपूर लोकसभेसाठी बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. बाळू धानोरकर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले आहेत. आधी काँग्रेसनं चंद्रपूरसाठी निष्ठावान असलेल्या विनायक बांगडे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र बांगडे यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांकडून विरोध झाल्यानंतर, काँग्रेसनं हा फेरबदल केला. यावर काँग्रेसच्या काही नेत्यांनी काँग्रेसची शिवसेना केल्याचा आरोप विनायक बांगडे यांनी केला. तर जनमताचा कौल धानोरकरांच्या बाजूने होता याची पक्षानं दखल घेतल्याबद्दल आभार मानत असल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी यावर दिली. दुसरीकडे हिंगोलीत काँग्रेसनं सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली.
बीड लोकसभा मतदारसंघ
बीड लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आज प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत,भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना तर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलीय. तब्बल 21 लाख मतदारसंख्या असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलंय. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असल्यानं आज दोन्ही पक्षाकडून जोरात शक्तिप्रदर्शन केलं जाणार हे निश्चित. भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, मंत्री पंकजा मुंडे, महादेव जानकर, राम शिंदे हे हजर राहणार आहेत तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बजरंग सोनवणे आपला अर्ज दाखल करणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आज नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कालच अशोक चव्हाणांनी प्रचाराचा नारळ फोडला. आज रॅली काढत अशोक चव्हाण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपातर्फे प्रताप पाटील चिखलीकर चव्हाणांना आव्हान देणार आहेत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे यशपाल भिंगे नांदेडमधून मैदानात आहेत. या तिघांमध्ये मुख्य लढत होणारेय. अशोक चव्हाणांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे.