मोदी सरकारने स्वत:ला भारतीय लष्कर समजणे बंद करावे- अखिलेश
मोदी सरकारने स्वत:ला भारतीय लष्कर समजणे बंद करावे.
नवी दिल्ली : सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सॅम पत्रोदा यांच्या बचावात उतरत पुन्हा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रश्न उपस्थित करणे हा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मोदी सरकारने स्वत:ला भारतीय लष्कर समजणे बंद करावे. आम्हाला प्रश्न विचारले जाऊ नये असे जे नेते म्हणतात ते धोकादायक असतात असेही अखिलेश यादव म्हणाले.
भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्याऐवजी पाकिस्तानशी चर्चा करायला पाहिजे होती, असे मत गांधी घराण्याचे निष्ठावंत सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केले. 'एएनआय' वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी त्यांनी यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, भारताकडून बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये खरंच ३०० दहशतवादी ठार झाले असतील तर सरकारने पुरावे सादर करून हा विषय संपवायला हवा. कारण, परदेशातील वृत्तपत्रांमध्ये याविषयी वेगळीच माहिती छापून आली आहे. त्यामुळे आपण खरंच बालाकोटमध्ये हल्ला केला का? या हल्ल्यात एकतरी दहशतवादी ठार झाला का?, अशा शंका माझ्या मनात उपस्थित झाल्या आहेत. देशाचा एक नागरिक म्हणून मला हे जाणून घेण्याचा हक्क आहे. यामुळे मी नागरिक म्हणून वाईटपणा ओढवून घेत असेन. पण म्हणून मी राष्ट्रप्रेमी नाही, असे नाही. मला केवळ सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे, इतकेच माझे म्हणणे आहे, असे पित्रोदा यांनी म्हटले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पित्रोदा यांच्यावर निशाणा साधला.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सर्वात विश्वासातील आणि त्यांचे मार्गदर्शकांनी काँग्रेसतर्फे पाकिस्तान नॅशनल डे साजरा करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय वायुसेनेचा अपमान करण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. हे न्यू इंडिया असून दहशतवाद्यांना त्यांच्या भाषेतच उत्तर दिले जाईल अलेही पंतप्रधान म्हणाले.