मला तिकीट न दिल्यास भाजपाचा पराभव निश्चित- साक्षी महाराज
हे पत्र व्हायरल झाल्यानंतर मात्र साक्षी महाराजांचे सूर बदलले.
उन्नाव : उन्नावचे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी आपल्या पार्टी नेतृत्वाला अप्रत्यक्ष धमकीच दिली आहे. यावेळेस मला पुन्हा तिकीट नाही दिली तर याचे परिणाम चांगले होणार नाहीत असे ते म्हणाले आहेत. असे झाल्यास उन्नावमध्ये भाजपाचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले. माझ्या व्यतिरिक्त इतर कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर भाजपाला याचे वाईट परिणाम दिसतील असे चार वेळा खासदार राहिलेले साक्षी महाराज म्हणत आहेत. आपण यासंदर्भात भाजपाचे प्रदेश अध्यक्ष महेंद्र नाथ पांडे यांना एक पत्र लिहिल्याचेही त्यांनी सांगितले. हे पत्र सोशल आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरही व्हायरल होत आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर मात्र साक्षी महाराजांचे सूर बदलले. त्यांनी 360 अंश कोनात आपली भूमिका बदलत तिकीट नाही मिळाले तरी भाजपाचा प्रचार करणार असल्याचेही हातोहात जाहीर केले.
पत्र लीक कसे झाले ?
हे पत्र माध्यमांमध्ये लीक झाल्याने साक्षी महाराज हैराण आहेत. हे पत्र खासदारांच्या लेटरहेडवर टाईप केले होते आणि हे पत्र कसे लीक झाले याची चौकशी व्हायला हवी असेही ते म्हणाले. माझे तिकीट तर पक्के आहे आणि मला यावर पूर्ण विश्वास आहे. उन्नावमध्ये मला तिकीट न देण्याबाबत पार्टीने कोणता निर्णय घेतला तर त्याचा राज्य आणि देशातील माझ्या कोट्यावधी कार्यकर्त्यांवर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. याचे परिणाम चांगले होणार नाहीत असेही ते म्हणाले.
भाजपा प्रदेश अध्यक्ष पांडे या साक्षी महाराजांनी पत्र लिहिले. '15 वर्षांनी या जागेवर मी विजय मिळवला होता. मला तुमचे लक्ष उन्नाव निवडणुकीकडे वेधायचे आहे. या लोकसभा सीटवर मी 2014 मध्ये 3 लाख 15 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर समाजवादी पार्टी दुसऱ्या नंबरवर होती. तर काँग्रेस आणि बसपा यांचे डिपॉझीटच जप्त झाले होते.' असे साक्षी महाराजांनी पत्रात लिहिले.
जर पार्टीने आपल्याला पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्यास पाच लाख मतांच्या फरकाने या जागेवर पुन्हा विजय मिळू शकतो असे साक्षी महाराजांनी म्हटले आहे.