नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची रविवारी घोषणा करण्यात आली. त्यानुसार देशातील ५४३ मतदारसंघांत सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. तर महाराष्ट्रात ११ एप्रिल ते २९ एप्रिल या काळात चार टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण चार टप्प्यात पार पडेल. महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान हे सात मतदारसंघांसाठी ११ एप्रिलला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील एकूण १० मतदारसंघासाठीचे मतदान १८ एप्रिलला होईल. तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे २३ एप्रिलला होणार असून या टप्प्यात १४ मतदारसंघांचे भवितव्य निश्चित होईल. तर २९ एप्रिलच्या अखेरच्या आणि चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिलपासून सुरु होईल. यावेळी २० राज्यांतील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान होईल. १८ एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील ९७ मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जातील. तर तिसऱ्या टप्प्यात १४ राज्यांमधील ११५ मतदारसंघात मतदार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील. २९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यात नऊ राज्यांतील ७१ जागांसाठी मतदान होईल. यानंतर ६ मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यात ५१ मतदारसंघ, १२ मे रोजी होणाऱ्या सहाव्या टप्प्यात सात राज्यांतील ५९ मतदारसंघ आणि १९ मे रोजीच्या अंतिम टप्प्यात आठ राज्यांमधील ५९ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल.

आंध्रप्रदेश, अरुणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मिझोराम, नागलँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान-निकोबार, दादरा-नगर, दीव-दमण, लक्षद्वीप, दिल्ली, पुद्दुचेरी आणि चंदीगढ या २२ राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. तर कर्नाटक, मणिपूर, राजस्थान आणि त्रिपुरात दोन टप्प्यांत मतदान होईल. तीन टप्प्यांत मतदान होणाऱ्या राज्यांमध्ये आसाम व छत्तीसगढ या राज्यांचा समावेश आहे. तर झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओदिशात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संवेदनशील परिस्थितीमुळे जम्मू-काश्मीरमध्ये पाच टप्प्यांत मतदान होईल. तर बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ या आकारमानाने विशाल राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. 


लोकसभेसह निवडणूक आयोगाने आंध्र प्रदेश, सिक्कीम विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा केली. या दोन राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेसाठी मतदान घेतले जाईल.


निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यामुळे आजपासून देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. यंदा देशातील मतदारांची संख्या ९० कोटी असून यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. एकूण ५४३ मतदारसंघांपैकी २८२ मतदारसंघांच्या राजकीय समीकरणांवर नवमतदारांमुळे प्रभाव पडणार आहे. तसेच या निवडणुकीत देशभरातील सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅटही उपलब्ध असेल. तसेच ईव्हीएम यंत्रांमध्ये फेरफार होण्याचा धोका टाळण्यासाठी प्रवासादरम्यान ही यंत्रे जीपीएसच्या साहाय्याने ट्रॅक करण्यात येणार आहेत.