मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये १८२ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर पक्षाचे अध्यक्ष अमित शाह पहिल्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरत आहे. मात्र, भाजचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कापून गांधीनगरमधून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. अहमदनगरमधून विद्यमान खासदार अलेले दिलीप गांधी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुजय विखे यांना येथून उमेदवारी देण्यात आली. लातूरमधून सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, लातूरचे विद्यामान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांची उमेदवारी कापली. गायवाड हे राजकारणात येण्यापूर्वी पत्रकारिता करायचे. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 पहिल्या यादीत महाराष्ट्रातून हे असणार उमेदवार


सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही तिढा अजून सुटलेला नाही. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापले जाणार असल्याचे बोलले जात आहे. उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांच्या नावाबाबत अजून गूढ कायम आहे. या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यांचाही पत्ता कट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेनेचा त्यांच्या नावाला प्रचंड विरोध असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.


 अडवाणी यांचा राजकीय अस्त



अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपचे भीष्म पितामह विद्यमान खासदार लालकृष्ण अडवाणी यांचा पत्ता कट झाला आहे. अडवाणी यांचा पत्ता कट झाल्याने त्यांचा राजकीय अस्त झाल्यातच जमा आहे. विक्रमी मताधिक्याने लालकृष्ण अडवाणी गांधीनगर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. १९९८ पासून ते गांधीनगरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. 


अडवाणी पहिल्यांदा १९९१ ते १९९६ च्या लोकसभेमध्ये निवडून आले होते. अपवाद फक्त ११व्या लोकसभेचा राहिला आहे. अकराव्या लोकसभेत म्हणजेच १९९६ मध्ये दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गांधीनगर लोकसभा मतदार संघातून विजय मिळवला. विजयानंतर त्यांनी गांधीनगरमधून राजीनामा देऊन लखनऊचे प्रतिनिधीत्व आपल्याजवळ ठेवले. पोटनिवडणुकीमध्येही भाजपनेच विजय मिळवला. विजय पटेल यांनी दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांचा पराभव केला. त्यानंतर सलग पाच टर्ममध्ये अडवाणी गांधीनगरमधून निवडून येत आहेत.