Loksabha Election : भाजपची दुसरी यादी तयार! 100 नावांचा झाला विचार, पुढील दोन दिवसांत जाहीर होणार नावं
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा 2024 साठी भाजपची दुसरी यादी जवळपास निश्चित झाली आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.
Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाकडून उमेदवाऱ्यांची चाचपणी सुरु आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यावर उर्वरीत जागेबद्दल काय निर्णय घेतला याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली असून यात अनेक उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालंय समजतं. त्यानुसार भाजपची दुसरी यादी तयार झाली असून अनेक नावांवर खलबत झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. ही यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. (Loksabha Election 2024 BJP Second List Ready 100 names were considered the names will be announced today or tomorrow)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षप्रमुख जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (CEC) बैठकीत 8 राज्यांमधील 100 हून अधिक जागांवर चर्चा केली. या बैठकीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार, हिमाचल आणि चंदीगड आदी राज्यांच्या जागांसाठी कुठला उमेदवार योग्य आहे यावर विचारमंथन झालं.
तीन तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील काही जागांवरही शिक्कामोर्तब करण्यात आलंय. महाराष्ट्रातल्या पहिल्या यादीत पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, भारती पवार यांची नावं जाहीर होऊ शकतात अशी माहिती सुत्रांनी दिलीय. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल आणि हरियाणाच्या 99 जागांच्या उमेदवारांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 13 मार्चनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. महाराष्ट्र, बिहार, हरियाणात जागावाटपाचा तिढा कायम आहे, त्याच पार्श्वभूमीवर भाजप आज दुसरी यादी जाहीर करु शकते.
'या' राज्यांमधील उमेदवारांना तिकीट देण्यास विलंब?
दरम्यान दुसरीकडे बिहार, ओडिशा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये युतीबाबत पूर्ण स्पष्टता अजूनही नाही. अशा स्थितीत या राज्यातील उमेदवारांबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही. यामुळे या राज्यांमधील उमेदवारांना तिकीट देण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमधील ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके), आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) आणि ओडिशातील बिजू जनता दल (बीजेडी) सोबत जनसेना यांच्याशी प्रस्तावित युती अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
'या' राज्यातील नावांवर चर्चा!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील उर्वरित सर्व 11 जागांवर चर्चा झाली असून ज्यामध्ये 7 जागांवर एकमत झाल्याचं बोलं जातंय. तर मध्य प्रदेशातील उर्वरित पाचही जागांवर चर्चा झाल्यानंतर चार जागांवर करार झाला असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील 25, तेलंगणातील आठ आणि कर्नाटकातील सर्व 28 जागांवर विचारमंथन झालं आहे. आता कुठल्या उमेदवाराला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये संधी मिळते हे पाहावं लागणार आहे.