Loksabha Election 2024 Sanjay Raut Talks About 4th June: "नरेंद्र मोदी व अमित शहा यांची राजवट 4 जूननंतर संपत आहे याबाबत आता कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही," असं ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "मोदी आणि शहा या दोघांना सत्तेवरून दूर करण्यासाठीच देशातील जनतेने मतदान केले. मोदी व शहा यांनी देशाचा तुरुंग केला व लोकशाहीलाच बंदिवान केले. त्यामुळे मोदी-शहांचा पराभव होऊ शकत नाही असा भ्रम निर्माण झाला. मोदी हे देवाचे अवतार आहेत असे चित्र निर्माण केले. त्यामुळे घरात अन्न, वीज, पाणी, रोजगार, निवारा नाही, पण मोदी हवेत. “माती खाऊन जगू” असे बोलणारे अंधभक्त या काळात दिसले, पण ज्यांनी आतापर्यंत मोदींना मतदान केले तो शेतकरी, कष्टकरीच मोदींच्या विरोधात उभा ठाकला," असं राऊत यांनी म्हटलं आहे.


मोदींनी पुतीनप्रमाणे राज्य केले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"मोदी यांनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केले. त्यांनी देशाला गुलाम केले व दहा वर्षांत गुलाम जन्माला घातले. तरीही गुलाम बंड करतोच. रशिया ज्याने शक्तिमान केला तो जोसेफ स्टालिन. स्टालिनच्या मृत्यूपूर्वी काही दिवसच भारताचे हायकमिशनर श्री. के.पी.एस. मेनन यांना स्टालिनची भेट मिळाली होती. स्टालिन त्यांना म्हणाला, “आमचा शेतकरी साधा माणूस आहे. लांडगा अंगावर आला तर तो त्याला उपदेश करीत नाही, सरळ ठार करतो! लांडग्याला हे समजते व तोही त्यामुळे अंगावर येत नाही.” भारताच्या शेतकऱ्याने तेच केले आहे," असा टोला राऊत यांनी त्यांच्या 'रोखठोक' या 'सामना'तील लेखामधून लगावला आहे.


सर्व संस्था गुलामीच्या बेड्या तोडून टाकतील


"निवडणुका जवळ जवळ संपल्या आहेत व 4 जूननंतर काय? यावर चर्चा सुरू आहेत. मोदी व शहा यांचा पराभव झाला तरी ते सहज सत्ता सोडणार नाहीत. एखाद्या हुकूमशहाप्रमाणे ते सत्ता सोडण्यास नकार देतील असे बोलले जाते ते खरे नाही. 4 जूनच्या दुपारनंतर देशात राज्यघटनेला उभारी मिळेल. लष्करप्रमुख, पोलीस, प्रशासन यांचे प्रमुख मोदी-शहांचे काहीएक ऐकणार नाहीत. या सर्व संस्था गुलामीच्या बेड्या तोडून टाकतील. “ये लोक कब जा रहे है?” अशीच भावना यापैकी प्रत्येक जण खासगीत व्यक्त करत होता," असंहा राऊत म्हणालेत.


तपास यंत्रणांचे हत्यारच नसल्याने या दोघांनाही...


"ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही व अमेरिकेच्या संसदेत त्यांचे भाडोत्री लोक घुसवून गोंधळ घातला. असा काही प्रकार मोदी-शहांचे लोक करतील काय? असे काहीच करण्याचे बळ त्यांच्याकडे राहणार नाही. या दोघांनाही पराभव स्वीकारावा लागेल. कारण कोणताही अतिरेकी प्रयोग केल्यास शांत डोक्याने क्रांती करणारा मतदार खवळून रस्त्यावर येईल," असं राऊत यांनी म्हटलं आहे. "ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीसप्रमुख दरम्यानच्या काळात राहुल गांधी यांच्या दारात भेटीसाठी उभे राहिल्याचे चित्र दिसेल. त्यामुळे विरोधकांना धमकावण्याची ताकद त्यांच्यात राहणार नाही. सत्तांतर शांतपणे व सुरळीत पार पडेल. मोदी व शहांमध्ये लढण्याचे बळ व कौशल्य नाही व तपास यंत्रणांचे हत्यारच नसल्याने या दोघांनाही कदाचित काही काळासाठी अज्ञातवासातच जावे लागेल. नाहीतर लोकांचा रोष सहन करावा लागेल," असं राऊत म्हणाले आहेत.