नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. भाजपा आणि काँग्रेसने याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक आयोगाने याप्रकरणी 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधी कायद्याचे कलम 77 अंतर्गत स्टार प्रचारकांच्या कृत्यांसाठी पक्षाच्या प्रमुखांना जबाबदार धरलं असून त्यानुसार नोटीस पाठवली आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी धर्म, जात, समाज किंवा भाषेच्या आधारे द्वेष आणि फूट पाडल्याचा आरोप केला होता. निवडणूक आयोगाने याप्रकरणी नोटीस जारी केली असून त्यांना उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. 29 एप्रिलला सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला आहे.
राजकीय पक्षांना त्यांचे उमेदवार आणि स्टार प्रचारक यांच्या वर्तनाची जबाबदारी घ्यावी लागेल असं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उच्च पदांवर असणाऱ्या लोकांनी अशा प्रकारची विधानं करणं अधिक चिंताजनक असून त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असं निवडणूक आय़ोगाने सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींच्या राजस्थानमधील वक्तव्यावरुन वाद
राजस्थानमधील एका प्रचारसभेत नरेंद्र मोदी म्हणाले होतं की, काँग्रेस सत्तेत आल्यास लोकांच्या संपत्तीचे वाटप घुसखोर आणि जास्त मुलं असलेल्यांमध्ये करेल. यावेळी नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला, ज्यात मनमोहन सिंग म्हणाले होते की देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याक समुदायाचा पहिला हक्क आहे. याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांचं विधान फार फूट पाडणारं आणि द्वेषपूर्ण असून आचारसंहितेचे स्पष्ट उल्लंघन आहे असं काँग्रेसने म्हटलं होतं. काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे 140 पानांच्या 17 तक्रारी केल्या आहेत.