Nirmala Sitharaman Net Worth: लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करत आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मात्र भाजपाचा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाकारला आहे. देशाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याचं कारण सांगितलं आहे. दरम्यान आपल्याकडे तितका पैसा नाही म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे हे जाणून घ्या... 


निर्मला सीतारमन यांची संपत्ती किती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्मला सीतारमन यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी सांगितलं आहे की, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी त्यांना आंध्रप्रदेश किंवा तामिळनाडूमधून निवडणूक लढण्याचा पर्याय दिला होता. पण लोकसभा निवडणूक लढण्यासाठी लागणारा तितका निधी माझ्याकडे नसल्याने नकार दिला आहे. 


निर्मला सीतारमन यांनी 2019 मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची संपत्ती 2 कोटींपेक्षा अधिक आहे. तसंच त्यांच्यावर 30 लाखांपेक्षा अधिक कर्ज आहे. 


पीएमओ वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये निर्मला सीतारमन यांच्याकडे फक्त 7350 रुपये रोख आणि सर्व बँक खात्यात 35 लाख 52 हजार 666 रुपये जमा आहेत. तसंच पीपीएफमध्ये त्यांनी 1 लाख 59 हजार 763 रुपये गुंतवले आहेत. याशिवाय म्युच्युअल फंडात 5 लाख 80 हजार 424 रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे कोणतीही जीवन विमा योजना नाही. तसंच एलआयसी किंवा इतर कोणताही विमा घेतलेला नाही. 


निर्मला सीतारमन यांनी जाहीर केलेल्या संपत्तीनुसार, त्यांच्याकडे एकही कार नाही. त्यांच्याकडे फक्त बजाज चेतक स्कूटर आहे, ज्याची किंमत 28 हजार 200 रुपये आहे. दागिन्यांबद्दल बोलायचं गेल्यास 2022 मध्ये त्यांच्याकडे एकूण 18 लाख 46 हजार 987 रुपयांचे दागिने होते. यामधील 315 ग्रॅम सोनं होतं. आजच्या तारखेला त्यांच्याकडे असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत 20 लाख रुपये आहे. 


निर्मला सीतारमन यांच्या स्थावर मालमत्तेबद्दल बोलायचं गेल्यास तेलंगणामधील हैदराबादमध्ये एक आलिशान घर आहे. ज्याची किंमत 1 कोटी 70 लाख 51 हजार 400 रुपये आहे. याशिवाय त्यांच्याकडे एक बिगरशेती जमीन आहे ज्याची किंमत 17 लाख 8 हजार 800 रुपये आहे. 


निर्मला सीतारमन यांच्याकडे 2 कोटींची संपत्ती असून, डोक्यावर लाखोंचं कर्जही आहे. 19 वर्षांपूर्वीचं गृहकर्ज, एक वर्षाचा ओव्हरड्राफ्ट आणि 10 वर्षांचं मॉर्गेज लोन आहे. 


निवडणूक आयोगानुसार, लोकसभा निवडणूक लढणारा उमेदवार जास्तीत जास्त 95 लाख रुपये खर्च करु शकतो. तसंच निवडणूक लढण्यासाठी पैसे कुठून आणले हेदेखील सांगावं लागतं. अनेक उमेदवारांची आर्थिक स्थिती चांगली असतानाही पक्षातून त्यांनी निवडणूक लढण्यासाठी निधी मिळतो. पण तरीही उमेदवाराला खर्चाचा हिशोब द्यावा लागतो.