LokSabha: `आधी हट्ट सोडा, गेल्या 10 वर्षांपासून तुम्ही फक्त...`, प्रशांत किशोर यांचा राहुल गांधींना सल्ला
LokSabha Election: राहुल गांधी (Rahull Gandhi) गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीका राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी केली आहे.
LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही तर राहुल गांधी (Rahull Gandhi) यांना माघार घेण्याबद्दल विचार करावा असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून अपयशी होत असतानाही एकतर बाजूला पडलेले नाहीत किंवा दुसऱ्या कोणाला पक्षाचे नेतृत्व करू देऊ शकले नाहीत अशी टीकाही केली आहे.
"माझ्या मते हे लोकशाहीविरोधी आहे," असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाला पुन्हा जीवनदार देण्याच्या हेतून रणनीती आखली होती. पण धोरणावरुन मतभेद झाल्यानंतर ते बाहेर पडले होते. "जेव्हा तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून एकच काम करत असता आणि त्यात यश मिळत नसतं तेव्हा ब्रेक घेण्यात काही चुकीचं नाही. पुढील 5 वर्षं इतर कोणाला तरी संधी देण्यात हरकत नाही. तुमच्या आईने केलं आहे," अशी आठवण त्यांनी करुन दिली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि 1991 मध्ये पी व्ही नरसिंह राव यांच्याकडे पदभार सोपवला होता.
जगभरातील चांगल्या नेत्यांमध्ये एक प्रमुख गुणधर्म हा आहे की त्यांच्यात काय कमतरता आहे हे त्यांना ठाऊक आहे आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करतात, असं ते म्हणाले. "पण राहुल गांधींना आपल्याला सगळं माहिती आहे असं वाटत असल्याचं दिसत आहे. जर आपल्याला मदतीची गरज आहे हे समजत नसेल तर कोणी मदत करु शकत नाही. आपल्याला जे योग्य वाटत आहे ते अंमलात आणणाऱ्या व्यक्तीची गरज आहे असं त्यांना वाटत आहे. हे अशक्य आहे".
2019 च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाचा दाखलाही प्रशांत किशोर यांनी दिला. हा दाखला देत त्यांनी सांगितलं की, "आपण मागे हटू आणि इतर कोणाला तरी काम करू देऊ असं त्यांनी लिहिलं होतं. पण, प्रत्यक्षात त्यांनी लिहिलेल्या गोष्टींच्या विरुद्ध काम करत आहेत".
अनेक काँग्रेस नेते खासगीत पक्षात कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत याची कबुली देतीत. अगदी एखादी जागा किंवा आघाडीतील मित्रपक्षांसह जागावाटप करण्याबाबत त्यांना एखाद्याकडून मान्यता मिळत नाही तोपर्यंत ते निर्णय घेऊ शकत नाहीत अशी माहिती प्रशांत किशोर यांनी दिली.
याउलट काही काँग्रेस नेत्यांची मात्र राहुल गांधी निर्णय घेत नसून, त्यांनी ते घ्यायला हवेत अशीही तक्रार असल्याचं प्रशांत किशोर यांनी सांगितलं आहे. काँग्रेस आणि त्यांचे समर्थक हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठे आहेत. आणि राहुल गांधींनी वारंवार अपयशी होऊनही पक्षासाठी तेच काम करतील असा हट्ट करु नये असा सल्ला दिला आहे.