प्रियांका गांधी वाड्रा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, हे आहे कारण
कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यावेळेस लोकसभा निवडणुक लढणार नसल्याची माहीती सुत्रांकडुन मिळत आहे.
नवी दिल्ली : कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यावेळेस लोकसभा निवडणुक लढणार नसल्याची माहीती सुत्रांकडुन मिळत आहे. निवडणूक लढण्याऐवजी त्या पार्टी प्रचारकडे लक्ष केंद्रीत करु इच्छित आहेत. पार्टीतील महत्त्वाच्या व्यक्तींनी एनडीटीव्हीकडे याबद्दल माहिती दिली आहे. प्रियांका गांधी यांनी जानेवारी पासून सक्रिय राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना महासचिव तसेच पूर्व यूपीचा प्रभारी बनवले. आगामी लोकसभा निवडणुकीत पार्टीला जिंकून आणण्यासाठी प्रियांका गांधी वाड्रा यांनी कंबर कसली आहे. मंगळवारी गुजरातच्या गांधीनगरमध्ये त्यांनी आपली पहिल्यांदा सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणांवर जोरदार हल्ला केला.
देशातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असून जनतेने जागरूक राहण्याची गरज असल्याचे वक्तव्य कॉंग्रेस महासिचव प्रियांका गांधी यांनी केले आहे.तुमची जागृकता एक हत्यार आहे. तुमचं मत हे एक हत्यार आहे. हे एक असे हत्यार आहे ज्याने कोणाला दु:ख पोहोचणार नाही. कोणालाही इजा पोहोचणार नाही. याचा वापर तुम्ही करायला हवा असे प्रियांका यावेळी म्हणाल्या.
तरुणांना रोजगार कसे मिळेल, महागाई कशी कमी होईल असेल हे निवडणुकीचे मुद्दे आहेत. 15 लाख येणार होते ते कुठे गेले. महिलांच्या संरक्षणाचे काय झाले हे प्रश्न त्यांना विचारा, असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला. मतदानातून तुमची देशभक्ती दिसायला हवी असे आवाहन त्यांनी जनतेला केले. ज्या ठिकाणाहून गांधींनी अहिंसेचा, देशभक्तीचा नारा दिला होता तिथूनच तुम्हीपण आवाज उठवायला सुरूवात केली पाहिजे, असे आवाहनही प्रियांका गांधी यांनी केले आहे.