`भगवान श्री कृष्ण आम्हाला जावयाप्रमाणे, कारण...`; जाहीर भाषणात मुख्यमंत्र्यांचं विधान
Lord Krishna Is Our Son In Law: गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर भाषण देताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे.
Lord Krishna Is Our Son In Law: आपल्या वादग्रस्त भूमिकांबरोबरच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथे आयोजित करण्यात आलेल्या 'अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव'च्या कार्यक्रमामध्ये बिसवा यांनी हे विधान केलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं हिमंत बिस्वा सरमा यांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री
'अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव'च्या कार्यक्रमात भाषण करताना हिमंत बिस्वा सरमा यांनी, "भगवान श्री कृष्णाला आम्ही आमचा जावई मानतो," असं म्हटलं आहे. "भगवान श्री कृष्णाबरोबर आमचा फार जुना संबंध आहे. आम्ही भगवान श्री कृष्णाला आमचा जावई मानतो. भगवान श्री कृष्णाने आसामची मुलगी रुक्मणीशी लग्न केलं होतं. त्यामुळे आमचं कृष्णाबरोबर जावयाचं नातं आहे," असं सरमा म्हणाले. तसेच पुढे बोलताना, 'गुजरातमधील माधेपूर खेरे येथे कृष्ण आणि रुक्मीणीच्या लग्नाचा उत्सव असतो तेव्हाही मी जातो. कारण ज्या ठिकाणी भगवान श्री कृष्ण असतो त्या ठिकाणी आमची उपस्थिती अनिवार्य असते,' असंही ते म्हणाले.
स्वत: पोस्ट केला व्हिडीओ
स्वत: हेमंत बिस्वा सरमा यांनीही हा व्हिडीओ आपल्या हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे.
मी कधीच निराश झालो नाही कारण...; अमित शाहांचं विधान
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा सुद्धा उपस्थित होते. अमित शाह यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे शाह यांनी विशेष कौतुक केलं. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली गीता मोहोत्सवाला सुरुवात केली. 2016 पासून मनोहरलाल खट्टर यांच्या प्रयत्नांनी त्याला अंतरराष्ट्रीय स्वरुप लाभलं. आजच्या मोहोत्सवामध्ये गुजरातबरोबरच आसाम आणि श्रीलंकेचाही समावेश आहे," असं अमित शाह म्हणाले. पुढे बोलताना अमित शाह यांनी, "माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय त्या जगाच्या कोपऱ्यापर्यंत मी सांगू इच्छितो की माझ्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. माझा स्वभाव पाहता असे चढ-उतार अपेक्षितच होते. मात्र आईने लहानपणापासूनच गीतेचे धडे दिल्याने कधीच निराशा झालो नाही," असंही सांगितलं.
18 हजार मुलांचा सहभाग
'अंतरराष्ट्रीय गीता मोहोत्सव 2023'च्या कार्यक्रमामध्ये तब्बल 18 हजार मुलांनी सहभाग घेतला. या 18 हजार मुलांनी गीतेचं पठण केलं. या मुलांनी एकत्र अष्टादश श्लोक गीता पाठण केलं. या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्याबरोबरच आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमाही उपस्थित होते.