Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत रामाचे भव्य मंदिर तयार होत आहे. उद्या 22 जानेवारीला रामललाच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील साधू-संत सहभागी होणार आहेत. देशभरातून राम भक्त अयोध्येला पोहोचू लागले आहेत. अयोध्येला जाण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील विमानात बसले आहेत. या विशेष दिवसाची राम भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या घरी असलेल्या लाखो भक्तांनादेखील अयोध्येतील मंदिर पाहण्याची इच्छा आहे. दरम्यान अंतराळातून राम मंदिर कसे दिसते? याची झलक इस्रोने दाखवली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध राज्ये, मंदिरे आणि धार्मिक स्थळांमधून प्रभू रामासाठी भेटवस्तू पाठवल्या जात आहेत. कधी कोणी कुलूप तर कधी कोणी लाडूचा प्रसाद अयोध्येला पाठवत आहे. अयोध्या शहरात सर्वत्र रांगोळी काढण्यात व्यग्र कोणीतरी आहे. पण अंतराळातून अयोध्या कशी दिसेल याचा विचार केला आहे का? इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने अयोध्येचा फोटो टिपला आहे. 


विशेष म्हणजे हा फोटो थेट अंतराळातून घेण्यात आला आहे. ज्यामध्ये रामाचे भव्य मंदिर दिसत आहे. प्रभू रामाचे मंदिर अंतराळातून कसे दिसते? याची उत्सुकता असलेल्यांसाठी हा फोटो म्हणजे पर्वणीच आहे. या फोटोत सरयू नदी आणि अयोध्या शहर पूर्णपणे दिसत आहे.


इस्रोने पाठवला फोटो 



इस्रोने काढलेल्या फोटो अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर पिवळ्या रंगात चिन्हांकित करण्यात आले आहे. हा फोटो पाहून राम मंदिराची भव्यता जाणवू शकते. 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. 21 जानेवारी हा विधींचा सहावा दिवस असून तो आज संध्याकाळपर्यंत संपणार आहे. 21 जानेवारीला संध्याकाळी रामललाच्या मूर्तीची नवीन मंदिरात स्थापना करण्यात येणार आहे. यानंतर 22 जानेवारीला करोडो भक्तांसमोर रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. 


सोहळ्यावर सायबर हल्ल्याचं सावट


अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर सायबर हल्ल्याचं सावट निर्माण झालं आहे. रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या थेट प्रक्षेपणावर सायबर हल्ल्याची धमकी मिळाली असल्याने अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी सर्व विभागांना सूचना दिल्या आहे. सरकारी संकेतस्थळे आणि पोर्टल्सच्या सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या.