Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे. 11 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होईल. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसघाची निवडणूक खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे. कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टप्प्यात किती जागांवर मतदान


गुजरात – 25, कर्नाटक – 14, महाराष्ट्र – 11, उत्तर प्रदेश -10, मध्य प्रदेश – 9, छत्तिसगड -7, बिहार – 5, पश्चिम बंगाल – 4, आसाम – 4, दादरा नगर हवेली - 1, दमन आणि दीव – 1, गोवा – 2


उत्तर प्रदेशमध्ये डिंपल यादव यांची तर मध्य प्रदेशातल्या लढतीत ज्योतिरादित्य सिंधिया आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. गुना मतदारसंघात भाजपच्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरोधात काँग्रेसच्या यादवेंद्र सिंह यादव यांचं आव्हान आहे. तर शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा रिंगणात आहेत.


राजगडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्यासमोर भाजपचे दोन वेळचे खासदार रोडमल नागर रिंगणात आहेत. गुजरातच्या राजकोटमध्ये भाजपच्या पुरुषोत्तम रुपाला यांना काँग्रेसच्या परेश धानानी यांचं आव्हान आहे. तर नवसारीमध्ये भाजपच्या सी.आर. पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचे नैशाध देसाई रिंगणात आहेत.


उत्तर गोव्यात काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना भाजप उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचं आव्हान आहे. कर्नाटकच्या शिमोगामध्ये दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांमध्ये लढत होतेय. माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांचा मुलगा बी.वाय. राघवेंद्र यांच्यासमोर दिवंगत मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांची मुलगी गीता शिवराजकुमार रिंगणात आहे. तर हावेरीमधून माजी मुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार बसवराज बोम्मई यांच्याविरोधात काँग्रेसचे आनंदस्वामी गड्डादेवर्मथ यांच्यात लढाई होणार आहे.


दरम्यान, 7 मे रोजी या सर्व दिग्गजांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.. तेव्हा मतदारराजा कोणाला कौल देतो याचा निकाल 4 जूनलाच लागेल.