पहिल्या नजरेत प्रेम, 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिप; फेब्रुवारीत लग्न अन् जूनमध्ये...शहीद कॅप्टनच्या पत्नीचा Video पाहून गहिवरून जाल
पहिल्या नजरेत प्रेम झाल्यानंतर एका महिन्यात ते नात्यामध्ये आलेत. 8 वर्षांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिप फेब्रुवारीत लग्न झालं. मनात संसाराची स्वप्न, पण ऐका क्षणात...
दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जवानांना त्यांच्या शौर्य आणि वीरताबद्दल कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र पदकाने सन्मानित करण्यात आलं. यावेळी एक तरुण सून आणि आईने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवला. शहीद कॅप्टन अंशुमन सिंग यांचं नाव घेताच समोर आली ती 26 वर्षीय शहीदाची पत्नी आणि त्याच्यासोबत अभिमानाने भरलेली आई...
त्यांच्या चेहऱ्यावर भयान शांतता आणि मनात असंख्य वादळ, संसाराची लाखरांगोळी....तर आईच्या चेहऱ्यावर अभिमान पण मनात वेदना...हे पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले. खरं तर तिच्या वेदनांची कल्पना करणं फार कठीण आहे. 19 जुलै 2023 सियाचीनमधील आगीच्या दुर्घटनेत आपल्या सहकारी जवानांना मदत करताना कॅप्टन शहीद झाले होते. यावेळी या शहीद कॅप्टनच्या पत्नीने आपली लव्ह स्टोरी सांगितली. ती ऐकताना काळीज पिळवटून जातं.
चिरकाल अमर राहणार अशी ही लव्हस्टोरी!
शहीद पत्नी स्मृती सिंह यांच्याकडे पाहून शहीद कॅप्टन त्यांच्यातूनच बोलत असल्याचा भास होतो. स्मृती यांनी मोठ्या शौर्याने आणि धैर्याने, अपघाताच्या एक दिवस आधी त्यांचं काय बोलणं झालं याबद्दल सांगितलं. 18 जुलैला कॅप्टन सिंग स्मृती यांना फोन केला होता. यावेळी ते दोघे बराच वेळ बोलत होते. या फोनवरील संवादात काही क्षणात पुढील 50 वर्षांच्या संसारीची स्वप्न रंगवली. घर, मुलं अगदी अनेक गोष्टीवर ते दोघे बोलले.
स्मृती यांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दलही सांगितलं. त्या म्हणाल्यात की, 'आमचे हे पहिल्या नजरेतील प्रेम. कॉलेजच्या पहिल्या दिवशी आम्ही भेटलो. महिनाभरातच त्यांची सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात निवड झाली. खरं तर आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयात भेटलो आणि एका महिन्यात त्यांची निवड वैद्यकीय महाविद्यालयात झाली. ते खूप हुशार होते. अवघ्या एका महिन्याच्या भेटीनंतर आम्ही 8 वर्ष लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्हाला वाटलं की आपण लग्न करावं आणि आम्ही लग्न केलं.'
पतीच्या आठवणीत कंठ दाटून आला असतानाही त्या पुढे म्हणाल्यात की, 'फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केल्यावर दोनच महिन्यात कॅप्टनची सियाचीनमध्ये पोस्टिंग झाली. त्यानंतर 18 जुलै फोन आला आम्ही 50 वर्षांच्या संसाराची स्वप्न रंगवली आणि फोन ठेवा. 19 जुलैला सकाळी जेव्हा मी उठली, तेव्हा मला फोन आला की आता तो नाही.'
'पहिले 7-8 तास आम्ही असे काही घडले हे स्विकारू शकलो नाही. खरं तर मी आजपर्यंत स्वत: ला सावरु शकली नाहीय. कदाचित हे खरं नसेल असा विचार करुन त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण आता माझ्या हातात कीर्ती चक्र आहे, ते खरं आहे, हे मला समजलंय. तो एक हिरो आहे. इतर तीन लष्करी कुटुंबांना जगता यावं म्हणून त्याने आपल्या प्राणांची आहुती दिलीय.' स्मृती हे जेव्हा सर्व काही सांगत होत्या तेव्हा नि:शब्द डोळे काही न बोलता इतकं बरंच काही सांगून जातात.