नवी दिल्ली : २०२० या वर्षामध्ये सर्वसामान्यांना गॅसच्या दरवाढीचा भडका सहन करावा लागू शकतो. ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी १०० ते १५० रूपये अधिक मोजावे लागण्याची शक्यता आहे. जुलै २०१९ ते जानेवारी २०२० या काळात गॅस सिलेंडरच्या किंमतीत महिन्याला सरासरी १० रूपये वाढ झाली. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२० या काळात तेल कंपन्यांनी अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमती ६३ रूपयांनी वाढवल्या आहेत. म्हणजेच सहा महिन्यांमध्ये दर महिन्याला १० रूपयांची वाढ झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या कच्च्या तेलाच्या किमती पाहता जर पुढील १५ महिने जर याच १० रूपये दराने भाववाढ होत राहिली तर तेल कंपन्यांना सरकारच्या अनुदानाची गरज लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे सरकार तेल कंपन्यांना अनुदान म्हणून जी रक्कम देते ती कमी करण्याची शक्यता आहे.


ग्राहकांना १४.२ किलोचा गॅस हा ५५७ रुपयांना मिळत आहे. या गॅससाठी सरकार १५७ रुपयांचं अनुदान देतं. हे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ६० डॉलर प्रती बॅरल एवढ्या आहे. पुढच्या १५ महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर राहिल्या आणि सरकारने अशाच पद्धतीने महिन्याला १० रुपये दराने भाववाढ केली, तर सरकारला तेल कंपन्यांना अनुदान द्यावं लागणार नाही.