नवी दिल्ली : सरकारने या आर्थिक वर्षात सिलेंडरवरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ देखील त्याचाच एक भाग आहे. अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. एलपीजीच्या दरात आता ७  रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ४८० रुपयांना मिळणारा सिलेंडर आता ४८७  रुपयांना मिळणार आहे. अर्थात हा दिल्लीतला दर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च २०१८ पर्यंत अनुदान संपवण्याचा निर्णय


पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी याबाबतची माहिती लोकसभेत लेखी स्वरुपात दिली. सरकारने हे आदेश ३०  मे २०१७ रोजीच दिले होते. यामध्ये तेल कंपन्यांना १ जून २०१७ पासून दर महिन्याला प्रति सिलेंडरमागे ४ रुपये वाढवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश मार्च २०१८  किंवा सिलेंडरवर दिलं जाणारं अनुदान संपेपर्यंत लागू असणार आहेत.


इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांना सिलेंडर अनुदान मार्च २०१८ पर्यंत संपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिलेंडरवर देण्यात येणार अनुदान पूर्णपणे रद्द करण्यासाठी सरकार मागील अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. 


१ जुलै २०१६ पासून एलपीजी सिलेंडरवर दर महिन्याला २ रुपये वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आतापर्यंत एकूण १० वेळा सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत.


 विनाअनुदानित सिलेंडर असणारे देशात एकूण २.६६ कोटी ग्राहक आहेत. देशात एकूण अनुदानित सिलेंडरचे १८.११ कोटी ग्राहक आहेत. अनुदानित सिलेंडरमध्ये पंतप्रधान उज्ज्वल योजनेअंतर्गत मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आलेल्या महिला ग्राहकांचाही समावेश आहे.