सायकलवरुन गावी जाणाऱ्या मजुराच्या परिवारास भरधाव कारने चिरडले
यामध्ये ४५ वर्षीय मजूर आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय.
नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसल्याने मजुर आपल्या गावची वाट धरत आहेत. पण गावी पोहोचण्याआधीच त्याच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. औरंगाबादमध्ये मालगाडीने १६ जणांना चिरडल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना लखनऊमध्ये समोर आली आहे. यामध्ये सायकलवरुन गावी जाणाऱ्या मजुराच्या परिवाराला मागून भरधाव येणाऱ्या कारने चिरडले. यामध्ये ४५ वर्षीय मजूर आणि त्याच्या पत्नीचा मृत्यू झालाय.
मजुर दाम्पत्य आपल्या चिमुरड्यांसह सायकलवरुन गावी छत्तीसगड येथे चालले होते. एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर दिली आणि वाहनचालक तिथून पसार झाला. यामध्ये कृष्णा साहू आणि प्रमिला कृष्णा साहू या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन चिमुरड्यांना किरकोळ जखमा झाल्या. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. आजुबाजूच्या लोकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. लखनऊ पोलीस यासंदर्भात अधिक चौकशी करीत आहेत.
लॉकडाऊनमुळे परिवारासमोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या दाम्पत्याने गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि वाटेतच ही दुर्घटना घडली. पोलीस त्या भरधाव कार चालवणाऱ्याचा शोध घेत असून मुलांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोपावण्यात आले आहे.