येत्या शुक्रवारी या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण !
या खग्रास चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य
मुंबई : या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण येत्या शुक्रवारी दि. २७ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. हे चंद्रग्रहण ३ तास ५५ मिनिटे होणार असून त्यातील खग्रास स्थिती एक तास त्रेचाळीस मिनिटे दिसणार असल्याचे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. दा. कृ. सोमण म्हणाले,त्यामुळे येत्या शुक्रवारचे २७ जुलैचे खग्रास चंद्रग्रहण हे या शतकातील ऐतिहासिक असे आहे. गेल्या शतकातील सर्वात मोठे खग्रास चंद्रग्रहण १६ जुलै २००० रोजी झाले होते. त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४७ मिनिटे दिसली होती. यापुढील शतकातील सर्वात मोठी खग्रास चंद्रग्रहणे
९ जून २१२३ व १९ जून २१४१ रोजी होणार असून त्यावेळी खग्रास स्थिती १ तास ४६ मिनिटे दिसणार आहे. खग्रास चंद्रग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल आणि चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार असेल तर एकूण ग्रहण कालावधी जास्त लागून ग्रहणाची खग्रास स्थिती जास्त वेळ दिसू शकते. चंद्र पृथ्वीपासून सरासरी ३ लक्ष ८४ हजार कि.मीटर अंतरावर असतो . तो दीर्घ वर्तुळाकार मार्गाने पृथ्वीभोवती भ्रमण करीत असतो. यावेळी शुक्रवार २७ जुलै रोजी चंद्र पृथ्वीपासून जास्त दूर ४ लक्ष ६ हजार कि.मीटर अंतरावर असणार आहे.
तसेच चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेच्या मध्यातून जाणार आहे. त्यामुळे चंद्राला पृथ्वीच्या छायेतून भ्रमण करण्यास जास्त वेळ म्हणजे ३ तास ५५ मिनिटे एवढा वेळ लागणार असून खग्रास स्थिती १ तास ४३ मिनिटे एवढा वेळ दिसणार आहे.ज्यावेळी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येते त्याला ‘ खग्रास स्थिती ‘ म्हणतात. अशावेळी पौर्णिमा असूनही चंद्रबिंब जास्त प्रकाशित न दिसतां काळसर, लालसर रंगाचे दिसते हे खग्रास चंद्रग्रहण अंटार्क्टिका ,आस्ट्रेलिया, रशियाचा काही भाग, संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप, मध्य आणि दक्षिण अमेरिका येथून दिसणार आहे.
शुक्रवार दि. २७ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री ११ वाजून ५४ मिनिटांनी ग्रहणास प्रारंभ होईल. उत्तररात्री १ वाजता संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने लालसर , काळसर दिसेल. म्हणजेच खग्रास स्थितीला प्रारंभ होईल. त्यानंतर उत्तररात्री २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती संपून चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडण्यास प्रारंभ होईल. उत्तर रात्री ३ वाजून ४९ मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडल्याने ग्रहण सुटेल.सर्व ठिकाणांहून याच वेळी चंद्रग्रहण दिसणार आहे.
या चंद्रग्रहणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रहणाच्यावेळी चंद्रबिंबाच्या दक्षिणेस सात अंशावर मंगळ ग्रह दिसणार आहे. २७ जुलै रोजीच मंगळाची प्रतियुती होणार असून मंगळ ग्रह ३१ जुलै रोजी पृथ्वीच्या जवळ ५ कोटी ७५ लक्ष कि. मीटर अंतरावर येणार आहे. सध्या आपल्याइथे पावसाळा असल्याने आकाश अभ्राच्छादित राहते. परंतु ज्या ठिकाणी आकाश निरभ्र असेल तेथून खग्रास चंद्रग्रहण व मंगळ दर्शनाचा लाभ घेता येईल. या नंतर पुढच्यावर्षी मंगळवार , १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचेही श्री. दा. कृ. सोमण यांनी सांगितले.