मुंबई : गुरुवारी जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा या ठिकाणी झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा निषेध सर्वच स्तरांतून करण्यात येत असून पाकिस्तानवर अनेकांचाच रोष ओढावला आहे. याच धर्तीवर कलाविश्वातूनही कलाकार मंडळी आता व्यक्त होत असून, त्यांनीही या भ्याड हल्ल्याची निंदा केली आहे. ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी हा दहशतवादी हल्ला आणि त्यात पाकिस्तानची भूमिका पाहता अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये पार पडणाऱ्या कराची आर्ट काऊन्सिलमध्ये जावेद अख्तर हे त्यांची पत्नी शबाना आझमी यांच्यासह उपस्थित राहणार होते. पण, आता मात्र त्या कार्यक्रमाला न जाण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबतची माहिती दिली. 




'कराची आर्ट काऊन्सिलने दिलेल्या आमंत्रणानंतर शबाना आणि मी कैफी आझमी यांच्या काही काव्यरचनांवर आधारित एका कार्यक्रम आणि परिषदेसाठी जाणार होतो. पण, आता मात्र आम्ही हा बेत रद्द केला आहे. १९६५ मध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी कैफी आझमी यांनी एक कविता लिहिली होती. और फिर कृष्ण ने अर्जुन से कहाँ.... असे त्याचे बोल होते', असं त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिलं. दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहत सीआरपीएफसोबत असणाऱ्या आपल्या खास नात्याची माहिती दिली. एका प्रख्यात लेखकाने अशा प्रकारे आमंत्रण नाकारणं ही अतिशय मोठी बाबा असून, आतातरी पाकिस्तान वठणीवर येणार का, हाच प्रश्न वारंवार सर्वांच्या मनात घर करत आहे.