चेन्नई : तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. करुणानिधी यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांची विचारपूस करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सध्या रीघ लागली आहे. ९४ वर्षीय करूणानिधी सध्या मूत्रविकाराने पीडित असून, कावेरी हॉस्पिटलचे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करूणानिधी यांची प्रकृती रात्री जास्त खालावल्यानं डीएमके कार्यकर्त्यांनी त्यांच्या गोपाळपुरम निवासस्थानी एकच गर्दी केली आहे. मात्र कुणालाही त्यांना भेटू दिलं जात नाही. एमडीएमके प्रमुख वायको, तमिळनाडू भाजप अध्यक्ष तमिळीसाई सुंदरराजन आणि तमिळी नेते वेलमुरगन यांनीही करूणानिधी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खास ट्वीट करून करूणानिधींच्या प्रकृतीत आराम पडावा, अशा शुभेच्छा व्यक्त केल्यात.


दरम्यान, प्रकृती स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. रुग्णालयातून त्यांना घरी पाठवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर सर्व उपचार केले जात आहेत, अशी माहिती द्रमुकचे कार्याध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी दिली. करुणानिधी यांची प्रकृती किंचितशी खालावली असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले होते. त्यानंतर लोकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही स्टॅलिन यांनी केले आहे.