नवी दिल्ली - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्येही काँग्रेसने सध्या तरी निर्णायक आघाडी घेतल्याचे दिसते आहे.  काँग्रेस आणि भाजप यांच्यात मतमोजणीच्या  सुरुवातीपासून जोरदार टक्कर सुरू होती. पण जसजसे कल हाती येत गेले तसतसे काँग्रेसने आघाडी घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या १५ वर्षांपासून मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आहे. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढविली होती. एक्झिट पोल्समध्येही काँग्रेस सत्ताधारी भाजपला जोरदार टक्कर देईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. ती खरी ठरल्याचे निकालाचे कल पाहता दिसते. भाजपचे उमेदवार १०१ जागांवर तर काँग्रेसचे उमेदवार ११६ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र सकाळी साडेदहाच्या सुमारास होते.  


मध्य प्रदेशमधील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फारशा सभा घेतल्या नव्हत्या. भाजपला सत्ता जाण्याचे संकेत मिळाल्यामुळेच मोदी यांच्या सभा घेण्यात आल्या नव्हत्या, अशी चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवरही भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर असल्याचे दिसते. मध्य प्रदेशातील शेतकरी शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारवर नाराज असल्याचे चित्र होते. त्यामुळे त्यांच्या रोषाला भाजपला सामोरे जावे लागले आहे.