मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. 8 महिन्यांच्या गरोदर (pregnant) सुनेचे पोट (stomach) कापून सासरच्यांनी मुलाला बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्मशानभूमीतील (crematorium) एका सफाई कामगाराने (Sweeper) हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. सफाई कामगाराने मृतदेहाचे पोट ब्लेडने फाडून पोटातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सुनेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलाचा मृतदेह देखील स्मशानभूमीत स्वतंत्रपणे पुरण्यात आला. (Madhya Pradesh Child removed from pregnant daughter in law dead body)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटात असलेलं मूल जिवंत आहे की मृत आहे हे पाहण्यासाठी स्मशानभूमीत जाळण्यापूर्वी सासरच्यांनी महिलेचे शवविच्छेदन करून घेतले होते. मात्र मुलाचाही मृत्यू झाल्याचे समजताच त्याचा मृतदेहही पुरण्यात आला. जबलपूरमधील बारेलाच्या पडवार येथे राहणाऱ्या राधा लोधीचा विवाह 24 एप्रिल 2021 रोजी पानगर येथील गोपी पटेलसोबत झाला होता. मात्र लग्नानंतर राधाचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता. 17 सप्टेंबर रोजी राधाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. ही माहिती राधाच्या आई-वडिलांना देण्यात आली नाही. मात्र माहिती मिळताच तिचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले, मात्र सासरच्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला.


मृत राधासोबत हे क्रूर कृत्य करत असताना सासरच्यांनी मोबाईलवरून या घटनेचा व्हिडिओही काढला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुरुष मृत गर्भवती महिलेचे पोट ब्लेडने फाडत आहे आणि त्यातून मृत नवजात अर्भक बाहेर काढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना दीड महिन्यापूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे.


जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मृत्यूच्या एक दिवस आधीही राधाचा सासरच्यांसोबत वाद झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि न्याय मिळावा, अशी विनंती केली.


लग्न झाल्यापासून सासरचे लोक हुंड्यासाठी बाईकची मागणी करत होते. मुलगी राधा 8 महिन्यांची गरोदर होती आणि 17 सप्टेंबर रोजी तिचा संशयास्पद  मृत्यू झाला, असे मृत महिलेच्या आईने सांगितले. मुलीचे पोट फाडतानाचा व्हिडिओ त्यांनी बुधवारी तक्रारीसोबत पोलिसांना दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले.


सासरच्या लोकांनी माहिती दिल्यानंतर आम्हीही स्मशानभूमीत पोहोचलो. तेथे सासरच्यांनी मृतदेह बाजूला ठेवत सफाई कामगाराला बोलावले. त्यानंतर सफाई कामगाराने महिलेच्या पोटात छिद्र पाडले. सफाई कामगाराने एकामागून एक अनेक वेळा पोटात ब्लेड चालवून बाळाला काढण्याचा प्रयत्न केला. बाळाची नाळ बाहेर आली. यानंतर बाळाची नाळ कापून बाळाला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृत बाळाचा मृतदेह पुरण्यात आला.