भोपाळ - मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला ११४ जागांवर यश मिळाले आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे काँग्रेसच या राज्यात सत्तेवर येणार हे निश्चित झाले आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे सरकार मध्य प्रदेशमध्ये सत्तेवर येईल आणि गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सुरू असलेली भाजपची राजवट संपुष्टात येईल. शिवराजसिंह चौहान हे गेल्या १५ वर्षांपासून राज्यात सत्तेवर होते. अखेर त्यांना पायउतार व्हावे लागले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसने या निवडणुकीत भाजपला कडवी टक्कर दिली. राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी मध्य प्रदेशमध्ये जाहीर सभा घेऊन आणि शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून पक्षाचा प्रचार केला. त्याचे फळ त्यांना निवडणुकीत बघायलाही मिळाले. काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळण्याचे अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वांच्या कारणांचा वेध घेणे गरजेचे आहे.


- दीड वर्षांपूर्वी पोलिसांच्या गोळीबारात ६ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. काँग्रेसने गेल्या दीड वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्यात रान उठवले होते.


- मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी सरकारी खर्चाने नर्मदा यात्रा काढल्यावर राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही सपत्नीक नर्मदा यात्रा केली.


- ज्योतिरादित्य शिंदे, अरुण यादव आणि अजय सिंह गेल्या दोन वर्षांपासून राज्यात दौरा करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.


- कमलनाथ यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी सोपवून काँग्रेसने एका अविवादित नेत्याकडे पक्षाचे नेतृत्त्व दिले.


- हिंदूंची मते मिळवण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. पारंपरिक पोशाखात त्यांनी मंदिराना भेट दिली. याचाही फायदा झाला.
- हातात गंगेचे पाणी घेत अगदी धार्मिक पद्धतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा काँग्रेसने केली.


- भाजपच्या हिंदूत्ववादी भूमिकेसमोर काँग्रेसने सौम्य हिंदूत्त्वाचा वापर केला.


- एकमेकांविरोधात लढणाऱ्या नेत्यांना एकत्र आणून त्यांना पक्षासाठी काम करण्याला राहुल गांधी यांनी तयार केले. भाजप राज्यात अपराजित आहे, असे धारणा होती. ती दूर करण्यात राहुल गांधी आणि काँग्रेस दोघेही यशस्वी ठरले.


- जिंकण्याची ताकद असणाऱ्या नेत्यांनाच पक्षाचे तिकीट देण्यासाठी काँग्रेसने खूप अभ्यास केला. त्यामुळे निवडक आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांनाच तिकीट दिले गेले. त्याचाही फायदा झाला.


- मध्य प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती कायद्याचा मुद्दाही निवडणुकीत प्रभावी ठरला. या कायद्यात सुधारणा करण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण राहिला. यामुळे एक गटातील मतदार थेट भाजपपासून दूर गेला.