नवी दिल्ली : मध्यप्रदेशमध्ये अटीतटीची लढाई आता संपुष्टात आलीय. निवडणूक आयोगानं मध्यप्रदेशचा निकाल अखेर बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास जाहीर केलाय. ११४ जागांवर ताबा मिळवत काँग्रेस हा इथला सर्वात मोठा पक्ष ठरलाय. या निकालानंतर आज बसपाच्या प्रमुख मायावतींनी मध्य प्रदेशात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. मध्य प्रदेशात काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या आहेत. त्यात समाजवादी पक्षाच्या एका आमदारानं आधीच त्यांना पाठिंबा दिलाय. त्यापाठोपाठ बसपाच्य दोन आमदारांचा पाठिंबा मिळाल्यानं आता काँग्रेसनं बहुमाताचा आकडा ओलांडलाय. काँग्रेसकडे आता ११७ आमदार असून भाजपाकडे सध्या १०९ आमदार आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस दावा करणार स्पष्ट आहे. आज सकाळी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आलीय...  


सकाळी १०.४५ वाजता : मायावतींचा पाठिंबा काँग्रेसला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय. 


भाजप आणि काँग्रेसनं एससी-एसटी वर्गाचा उद्धार केला नाही. काँग्रेसच्या राज्यात कधीही दलितांचं भलं झालेलं नाही. यासाठीच आम्ही बसपा बनवलं... काँग्रेसशी आपले मतभेद असले तरी जनतेनं काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिलीय. म्हणून बसपानं काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय, असं लखनऊमध्ये मायावती यांनी म्हटलंय. 


दरम्यान, यामुळे काँग्रेसच्या ११४ आणि २ बसपाच्या दोन आणि सपाची १ जागा मिळून आता काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालंय.


शिवराज सिंह यांच्या घरी बैठक


भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, विनय सहस्रबुद्धे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आणि भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह उपस्थित आहेत. या बैठकीनंतर शिवराज सिंह एक पत्रकार परिषदही घेणार आहेत.


सकाळी ९.०० वाजता : मायावती कधी उघडणार पत्ते?


बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती थोड्याच वेळात एक पत्रकार परिषद घेणार आहेत. बीएसपीसमोर सध्या तीन पर्याय आहेत... यापैंकी मायावती कोणता पर्याय निवडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत. 


सूत्रांच्या माहितीनुसार, मायावती काँग्रेसला समर्थन देऊ शकतात. बीएसपी सुप्रीमो मायावती पत्रकार परिषदेत समर्थन जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. याचा फायदा या दोन्ही पक्षांना लोकसभा निवडणूक २०१९ मध्येही दिसेल, असंही म्हटलं जातंय.


मध्यप्रदेशात कोण करणार सत्ता स्थापन? काँग्रेस की भाजप?


मध्य प्रदेशात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं सत्ता स्थापनेची संधी काँग्रेसला आहे. बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. काँग्रेसकडे ११४ जागा आहेत. समाजवादी पार्टी आणि बसपा किंवा फक्त बसपाने पाठिंबा दिला तरी काँग्रेसचे सरकार येऊ शकते.


तर दुसरीकडे, भाजपाने १०९ जागा जिंकल्या आहेत. सद्य परिस्थितीत मोडतोड करूनही भाजपला सत्तेपर्यंत पोहचणं कठिण दिसतंय. काँग्रेस व भाजपा व्यतिरिक्त इथे सपा १, बसपा २ आणि अपक्ष ४ आमदार निवडून आलेले आहेत. या सगळ्यांना बरोबर घेतले तरच भाजपाचा आकडा ११६ पर्यंत जाऊ शकतो.


बहुमतासाठी आवश्यक आकडा = ११६


पहिली शक्यता : काँग्रेस ११४ + २ बसपा + १ सपा = ११७


दुसरी शक्यता : भाजपा १०९ + २ बसपा + १ सपा + ४ अपक्ष = ११६


काँग्रेस की भाजप

सकाळी ९.०० वाजता


निकाल जाहीर झाल्यानंतरही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह मात्र हार मानायला तयार नाहीत. शिवराज सिंह सकाळी १० वाजता एक पत्रकार परिषद घेणार आहेत.


यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी बुधवारी आम्ही राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. राकेश सिंह यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसला जनादेश मिळालेला नाही... तसंच राज्यातील अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला. 


सकाळी ०८.५० वाजता


निकाल जाहीर होण्याआधीच कमलनाथ यांनी एका पत्रकाद्वारे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना काँग्रेस  सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं म्हटलंय.


सकाळी ०८.४५ वाजता


मध्यप्रदेशात काँग्रेस हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरलाय. काँग्रेसला ११४ जागा मिळाल्यात. बहुमतासाठी ११६ जागा मिळवणं आवश्यक होतं.


सचिन पायलट आणि अशोक गेहलोत, काँग्रेस

सकाळी ०८.४० वाजता


मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०१८ चा निकाल आता स्पष्ट झालाय. इथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नाही


मध्यप्रदेश निवडणूक निकाल २०१८

 


सकाळी ०८.३० वाजता


नवी दिल्ली : मध्य प्रदेशाच्या निकालात सर्वात जास्त अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. २३० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत २२९ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. ११६च्या जादुई आकड्यापर्यंत काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना पोहोचता आलेलं नाही. अजूनही मतमोजणी सुरू आहे... काँग्रेसनं आतापर्यंत ११३ जागांवर विजय मिळवलाय. तर एक जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. 


दुसरीकडे भाजपाचे १०९ आमदार निवडून आले आहेत.  समाजवादी पक्षाच्या एका आमदारनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे आता काँग्रेसकडे एकूण ११५ आमदार आहे. ११६ चा आकडा गाठण्यासाठी अवघ्या काँग्रेसला एका आमदाराची अजूनही गरज आहे. पण बसपा आणि ४ अपक्षांपैकी तीन आमदार काँग्रेसचेच बंडखोर असल्यानं बहुमत गाठणं काँग्रेसला सोपं आहे.


मध्यप्रदेशात सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचं कमलनाथ यांनी एका पत्राद्वारे राज्यपालांना कळवलंय. तिकडे मध्यप्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनीही ट्वीट करून सत्तेच्या स्पर्धेत कायम असल्याचं म्हटलंय.