भोपाळ : ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याआधी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि मध्य प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राम मंदिर निर्माणाचं समर्थन केलं आहे. राम मंदिराची निर्मिती प्रत्येक भारतीयाच्या सहमतीने होत आहे, असं कमलनाथ म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अयोध्येतल्या राम मंदिर निर्माणाचं मी स्वागत करतो. देशवासीयांना याची खूप दिवसांपासून अपेक्षा होती. राम मंदिराची निर्मिती प्रत्येक भारतीयाच्या सहमतीने होत आहे. हे फक्त भारतातच शक्य आहे,' असं कमलनाथ म्हणाले आहेत. 



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा कसा, असणार याचा रोडमॅपही तयार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचल्यावर सगळ्यात आधी हनुमानगढी मंदिरात जाऊत हनुमानाचं दर्शन घेतील. रामलल्लाच्या कामाआधी हनुमानाची परवानगी घेण्याची परंपरा अयोध्येत आहे. 


हनुमानगढीनंतर पंतप्रधान राम जन्मभूमी परिसरात जातील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान राम मंदिराचं भूमिपूजन करतील. रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये मंदिराचं भूमिपूजन होईल.


राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. राम मंदिर निर्माणावर पंतप्रधान अयोध्येतून ऐतिहासिक भाषण करतील. याचबरोबर मोदी राम जन्मभूमी परिसरातून अयोध्येच्या विकासासाठीच्या योजनांचं लोकार्पण आणि शिलान्यास करतील. 


शिलान्यास केल्यानंतर पंतप्रधान काही वेळ राम जन्मभूमी परिसरात घालवतील. यावेळी ते काही प्रमुख साधू-संतांचीही भेट घेणार आहेत.