भोपाळ : वीज बिल न भरल्याने न्यायालयाची नोटीस हातात पडल्याने दु:खी झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील हरदा येथे हा प्रकार घडला आहे. हरदामधील अबगाव येथे राहणाऱ्या दिनेश पांडेय यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली आहे. 


हरदाचे पोलीस अधिक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, ६० वर्षीय दिनेश पांडेय यांनी विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली. ग्रामस्थांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह विहीरीतून बाहेर काढत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला. 


दरम्यान, मृतक दिनेश पांडेय यांचा मुलगा संजयने म्हटले की, तीन दिवसांपूर्वी पोलीस आमच्या घरी आले होते. त्यांनी वडीलांना ९,१११ रुपये वीज बिल भरण्याची न्यायालयाची नोटीस दिली. नोटीसनुसार बिल भरण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर होती त्यामुळे वडील मानसिक दबावाखाली आणि त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली.


संजय पांडेय याने सांगितले की, माझे वडील रविवारी दुपारपासुनच बेपत्ता होते. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह विहीरीत आढळला.