भोपाळ: मध्यप्रदेशातील खंडवा येथे एका तरूणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. हे कृत्य पीडितेच्या वडील आणि भावाने केले. पीडित तरूणीही कोर्ट मॅरेज करण्यासाठी निघाल्याचा राग मनात धरून वडील, भावाने हे कृत्य केल्याची माहिती आहे. खंडवा येथील आदिवासी विकासखंड खालवा येथील चैनपूर गावात ही घटना घडली. गावात अशा प्रकारे घडलेली ही पहिलीच घटना आहे. मृत तरूणीचे नाव लक्ष्मी यदुवंशी (वय-१९ वर्षे) असे असल्याचे सांगितले जात आहे. वडील आणि भाऊ लक्ष्मीला तिच्या प्रियकराच्या घरून फरफटत घेऊन आले आणि त्यांनी तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.


मारहाण करून अर्धमेली केले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राप्त माहितीनुसार, पीडिता आपला प्रियकर राजकुमार याच्यासोबत कोर्ट मॅरेज शुक्रवारी करणार होती. त्यासाठी खंडवा कोर्टात जाण्यासाठी ती राजकुमारच्या घरी आली होती. या प्रकाराची माहिती पीडितेच्या कुटुंबियांना कळताच पीडितेचे वडील आणि भाऊ राजकुमारच्या घरी आले. दोघांनी राजकुमारच्य घरून लक्ष्मीला फरफटत बाहेर काढले आणि तिला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत ती अर्धमेली झाली असतानाच त्यांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून दिले. या घटनेत लक्ष्मी हिचा जागेवरच मृत्यू झाला.


पोलिसांकडून तपास सुरू 


खंडवा येथील पोलिस अधिकारी रूची वर्धन मिश्र यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरपींनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. तसेच, दोघांविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास कसून सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शी आणि गावातील नागिरिकांची साक्ष घेण्यासही सुरूवात केली आहे.


प्रेमी युगूल अल्पवयीन


घटनेबाबत माहिती अशी की, पीडिता इयत्ता ११वीत शिकत होती आणि इयत्ता आठवीत शिकणाऱ्या राजकुमारवर प्रेम करत होती. गेली १० महिने दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. राजकुमारची आईही लक्ष्मीला पसंद करत होती. तिने लक्ष्मीच्या आई-वडीलांकडे दोघांच्या लग्नाबाबत चर्चाही केली. मात्र, त्यांनी या प्रस्तावास नकार दिला. दरम्यान, लक्ष्मी हिने राजकुमारला विवाहासाठी आवश्यक असणारी कागदपत्रेही पुरवली होती. लक्ष्मीच्या कुटुंबियांकडून लग्नाला होणारा विरोध पाहून दोघांनी कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला होता.